भीषण! पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करून आत्महत्या; क्रिकेट सट्ट्याने केला घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 09:02 PM2022-01-18T21:02:15+5:302022-01-18T21:02:58+5:30
क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे डोक्यावर लाखोंचे कर्ज झाल्याने वेडापिसा झालेल्या एका व्यक्तीने स्वतःची पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करून स्वतः गळफास लावून घेतला. ही थरारक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.
नागपूर - क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे डोक्यावर लाखोंचे कर्ज झाल्याने वेडापिसा झालेल्या एका व्यक्तीने स्वतःची पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करून स्वतः गळफास लावून घेतला. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दयानंद पार्क जवळ घडलेली ही थरारक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.
मदन अग्रवाल (वय ४०) असे या प्रकरणातील मृत आरोपीचे नाव आहे. त्याच्या क्राैर्याला बळी पडलेल्या पत्नीचे नाव किरण (वय ३४), मुलगा वृषभ (वय १०) आणि मुलगी टिया (वय ५) अशी आहे.
दयानंद पार्कच्या बाजुला आरोपी मदन चायनीजचा हातठेला लावत होता. याच परिसरातील किरण सोबत त्याने १४ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना वृषभ आणि टिया ही दोन मुले होती. चायनीजचा व्यवसाय चांगला चालत असल्याने त्याची मिळकत चांगली होती. त्यामुळे त्याने काही वर्षांपूर्वी साडेसहा लाखांचे घर घेतले होते आणि त्याचे रिनोवेशनही केले होते. सर्व व्यवस्थित असताना मदनला क्रिकेट सट्ट्याचे व्यसन जडले. त्यामुळे त्याला पैसा कमी पडू लागला. होते नव्हते ते सर्व गमावल्यानंतर त्याने स्वतःचे राहते घरही बँकेत गहाण ठेवले. कर्ज थकीत झाल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी बँकेने मदनचे घर जप्त केले. त्यामुळे तो परिवारासह दयानंद पार्क जवळ भाड्याच्या खोलीत राहायला आला. सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत तो आजूबाजूच्यांना दिसला. आज दुपार झाली तरी त्याच्या घराचे दार बंदच होते. वारंवार फोन करूनही तो प्रतिसाद देत नसल्याने त्याच्याकडे आलेल्या त्याचा एक मित्र कंपाउंड वॉल चढून आत गेला. दार बंद दिसल्याचे त्याने खिडकीतून डोकावले असता मदन समोरच्या खोलीत गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे मित्राने घरमालकाला ही माहिती दिली. घरमालकांनी शेजारी तसेच जरीपटका पोलिसांना कळविले. जरीपटक्याच्या पोलीस उपनिरिक्षक धुमाळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्ल्या. त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. समोरच्या रूममध्ये मदन गळफास लावलेल्या अवस्थेत होता.
अन् पोलीसही शहारले
पोलिसांनी आतल्या खोलीत पाय टाकताच त्यांचा थरकाप उडाला. एका बेडवर चिमुकली टिया आणि वृषभ रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. त्यांच्या पोटावर चाकूचे घाव होते. दुसऱ्या बेडवर किरण रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. गळा कापून तिची हत्या करण्यात आली होती. हे दृश्य पाहून जरीपटका पोलिसांनी वरिष्ठांना कळविले. त्यानुसार, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, घटनेची माहिती कळताच बाजूला राहणारे मदनच्या सासरची मंडळी तसेच त्याचे शांतीनगरात राहणारे भाऊ आणि इतर कुटुंबीय पोहचले. तोपर्यंत तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. पोलिसांनी पंचनामा करून रात्री मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केले.
३० ते ४० लाखांचे कर्ज
सूत्रांच्या माहितीनुसार, मदन अग्रवाल याच्यावर क्रिकेट बुकींचे ३० ते ४० लाखांचे कर्ज होते. संबंधित बुकी कर्ज वसुलीसाठी त्याच्यामागे तगादा लावत होते. त्याला कंटाळूनच मदनने आपल्या निर्दोष पत्नी आणि मुलांची निर्घुण हत्या करून स्वतःला संपविले असावे, असा संशय आहे.
रात्री मागितले भावाला पैसे
काही वर्षांपूर्वी पैशात खेळणारा मदन अग्रवाल क्रिकेटच्या व्यसनामुळे पै-पैशासाठी मोताद झाला होता. सोमवारी सायंकाळी त्याने आपल्या भावाला पंधराशे रुपयांची नितांत गरज असल्याचे म्हटले. त्यामुळे भावाने त्याच्या खात्यात पंधराशे रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले होते.
दुपारी सासरे आले मात्र...
मदनच्या सासरची मंडळी बाजुलाच राहतात. दुपारी त्याचे सासरे मुलगी किरण आणि नातवांना भेटण्यासाठी आले. त्यांना कंपाउंट वॉलचे लोखंडी गेट कुलुपबंद दिसल्याने ते परत गेले. रात्री त्यांना मुलगी अन् नातवंडांसह आरोपी जावयांचा मृतदेहच बघायला मिळाला.
----