आयपीएलचा थरार बंद, बुकींकडून वसुलीचा जीवघेणा खेळ सुरू

By नरेश डोंगरे | Published: June 5, 2023 09:34 PM2023-06-05T21:34:00+5:302023-06-05T21:34:06+5:30

भाडोत्री गुंडांना वसुलीचे कंत्राट : अनेक जण प्रचंड दहशतीत

thrill of IPL is over, deadly game of recovery from bookies is on | आयपीएलचा थरार बंद, बुकींकडून वसुलीचा जीवघेणा खेळ सुरू

आयपीएलचा थरार बंद, बुकींकडून वसुलीचा जीवघेणा खेळ सुरू

googlenewsNext

नागपूर : आयपीएल क्रिकेट सामन्यांचा थरार बंद झाला. मात्र, याच सामन्यांवर लाखोंचा क्रिकेट सट्टा लावून हरलेल्या अनेक सटोड्यांचा जीव आता अस्वस्थ आहे. क्रिकेट सट्ट्यात हरलेली रक्कम वसूल करण्यासाठी बुकींनी खतरनाक भाडोत्री गुंडांना हाताशी धरले आहे. हे गुंड सटोड्यांच्या जीवावर उठल्यासारखे झाले आहेत. छत्तीसगडमधील एका बुकीने तर ३० लाखांच्या वसुलीसाठी एका सटोड्याचे अपहरण करून त्याची हत्या करून घेतली. नागपुरात बुकींच्या धाकामुळे दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. तर, अनेक जण प्रचंड दहशतीत जगत असल्याची चर्चा आहे.

आपल्या नेटवर्कमध्ये आलेल्या सटोड्यांना नागपूरसह ठिकठिकाणचे बुकी प्रारंभी छोटी आणि नंतर लाखोंच्या हारजीतची मोठी 'र्केडिट लाईन' देतात. या लाईनच्या आधारे बड्या बुकीच्या माणसांकडे (एजंट, दिवानजी) सटोडे एकेका मॅचवर लाखोंची लगवाडी करतात. बोटावर मोजण्याएवढे सटोडे जिंकतात तर मोठ्या संख्येतील सटोडे मोठी रक्कम हरतात. अपवाद वगळता बहुतांश बुुकी हमखास जिंकतात. विशेष म्हणजे, कोट्यवधींची खयवाडी करणारे बडे बुकी गुंडांची टोळी हाताशी ठेवतात. हे गुंड भल्या सकाळी, भरदिवसाच नव्हे तर रात्री बेरात्री कधीही, कुठेही संंबंधित सटोड्याला पकडतात आणि मॅचमध्ये हरलेली बुकींची रक्कम वसुल करण्यासाठी मारहाण करतात. कुटुंबीय, नातेवाईकांसमोर त्याला अपमाणित करून त्याला तसेच त्याच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देतात.

आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर बडे बुकी आणि त्यांच्या गुंडांचा हा सटोड्यांच्या जीवावर उठण्याचा प्रकार सुरू होतो. सध्या हा जीवघेणा प्रकार सर्वत्र जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक जण जीव मुठीत घेऊन प्रचंड दहशतीत जगत असल्याची चर्चा आहे. बुकी आणि त्यांच्या गुंडांची दहशतच एवढी आहे की अनेक जण पोलिसांकडे जाण्याऐवजी जीव देणे पसंत करतात. काही जण मात्र पोलिसांकडे जातात परंतू ते तक्रारीचे स्वरूप बदलवतात. विशेष म्हणजेे, खबरी म्हणून काम करणारे काही दलालही चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बडे बुकी पोलिसांच्या तपासातून स्वत:ची मानगुट सोडवून घेण्यात यशस्वी होत आहेत.

सोमवारी पहाटे शंकरनगर चाैकात एका व्यावसायिकाला घेरून मारहाण करून 'एक पेटी, आधी पेटी'ची खंडणी मागून धमकी दिल्याचा प्रकार घडला. हा गुन्हा क्रिकेट सट्टा वसुलीच्या संबंधातूनच घडल्याची जोरदार चर्चा असली तरी तक्रारीत मात्र केवळ खंडणीच्या मागणीचा उल्लेख आहे. याची कसून चाैकशी केल्यास बुकी, गुंड आणि वसुलीचे कनेक्शन पुढे येऊ शकते. विशेष म्हणजे, हे प्रकार केवळ नागपूर पुरतेच मर्यादित नाही. नागपूरच्या बुकींचे नेटवर्क विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आहे. मध्यप्रदेश, खानदेेश आणि छत्तीसगडमध्येही आहे. त्यामुळे वसुलीचा जिवघेणा प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याची चर्चा आहे.

नवीन कामठीतील रहिवासी आयुष अजय त्रिवेदी (वय २६) या तरुणाने स्वत:च्या डोक्यात पिस्तुलाने गोळी घालून जीव दिला. क्रिकेट सामन्यावर लावलेल्या सट्ट्यात तो १४ लाख रुपये हरल्याने त्याच्यावर प्रचंड दडपण आले आणि त्याचमुळे त्याने जीव दिल्याची संबंधित वर्तुळात चर्चा आहे. या प्रकरणात बुकी कामठ्याचे नाव चर्चेत आले आहे.

छापरूनगरातील खितेश वाधवानी याने क्रिकेट सट्ट्याची रक्कम वसुल करण्यासाठी बुकी आणि त्याचे गुंड जिवावर उठल्यामुळे गळफास लावून घेतला. खिेशच्या आत्महत्येमुळे शोक अनावर झाल्याने त्याची आई दिव्या यांनी विष घेऊन आत्महत्या केली. खितेशकडे पाटील नामक बुकीने वसुलीसाठी तगादा लावला होता. मात्र, पोलीस तपासात पाटील आणि खितेशला मारहाण करणाऱ्यांचे नाव रेकॉर्डवर आले का नाही, ते कळायला मार्ग नाही.

Web Title: thrill of IPL is over, deadly game of recovery from bookies is on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.