छत्तीसगडमधील थरारकांड; क्रिकेट सट्ट्याच्या वसुलीसाठी कॉन्ट्रॅक्ट किलरकडून सटोड्याची हत्या
By नरेश डोंगरे | Published: June 5, 2023 07:00 PM2023-06-05T19:00:37+5:302023-06-05T19:01:02+5:30
Nagpur News क्रिकेट सट्ट्यातील लाखोंची रक्कम वसुल करण्यासाठी एका व्यक्तीची हत्या करून बुकी तसेच त्याच्या साथीदारांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे एका पोत्यात भरून मृतकाच्या दुचाकीला बांधून ही दुचाकी खदानीच्या पाण्यात फेकून दिली.
नरेश डोंगरे
नागपूर : क्रिकेट सट्ट्यातील लाखोंची रक्कम वसुल करण्यासाठी एका व्यक्तीची हत्या करून बुकी तसेच त्याच्या साथीदारांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे एका पोत्यात भरून मृतकाच्या दुचाकीला बांधून ही दुचाकी खदानीच्या पाण्यात फेकून दिली. आरोपींना नागपूरच्या रेल्वेस्थानकावर अटक केल्यानंतर भिलाई (छत्तीसगड)मधील या थरारक हत्याकांडाचा उलगडा झाला.
ओमप्रकाश साहू असे मृताचे तर आशिष सूर्यप्रताप तिवारी (वय ३४, रा. साकिन, जामुल,छत्तीसगड), अंकू उर्फ रजनीश पांडे (वय ३०, रा. सेक्टर ११, दुर्ग) तसेच लाला उर्फ अनुज सिताशरण तिवारी (वय१९, रा. दुर्ग, छत्तीसगड) अशी आरोपींची नावे आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, आशिष तिवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो बुकी असल्याचे समजते. तर, अंकू पांडे आणि लाला तिवारी हे दोघे अट्टल गुन्हेगार असून त्यांनी सुपारी घेऊन हे निर्घृण हत्याकांड घडवून आणले.
मृतक साहू हासुद्धा गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याला क्रिकेट बेटिंगचेही व्यसन होते. बुकी आशिष तिवारीची साहूसोबत ओळख होती. आयपीएलच्या सामन्यानंतर तिवारीचेे वैमनस्य आले. साहू पैसे देत नसल्यामुळे तिवारीने भाडोत्री गुन्हेगार अंकू पांडे आणि लाला तिवारीला सोबत घेतले. ३१ मे च्या रात्री आशिष, अंकू आणि लाला या तिघांनी साहूचे अपहरण केले. मध्यरात्री साहूची पत्नी विमला हिला फोन करून या अपहरणाची माहिती देऊन सट्टेबाजीच्या ३० लाखांची मागितली. खंडणीची रक्कम न दिल्यास किंवा पोलिसांना माहिती दिल्यास साहूचा मृतदेह घरी पाठवून देऊ अशी आरोपींनी धमकीही दिली. १ जूनला विमला साहूने भिलाई ठाण्यात तक्रार नोंदवली. तत्पूर्वीच आरोपींनी साहूची गळा दाबून हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे आरीने तुकडे केले. हे तुकडे एका पोत्यात भरून ते साहूच्या दुचाकीला बांधले आणि ती दुचाकी खदानीच्या पाण्यात फेकून दिली.
दरम्यान, तक्रार दाखल होताच छत्तीसगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयीत आरोपी आशिष तिवारीला अटक केली. फरार आरोपी नागपूरकडे पळाल्याचे कळताच येथील रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) सिनियर कमांडंट आशुतोष पांडे यांच्याशी भिलाई पोलिसांनी संपर्क केला. पांडे यांनी आरपीएफच्या क्राइम इंटेलिजन्स ब्युरो (सीआयबी)चे पोलीस निरीक्षक आर. एल. मिना, नवीन प्रताप सिंग आणि त्यांच्या पथकाला कामी लावून ३ जूनला आरोपी अंकू पांडे आणि लाला तिवारीला नागपूर रेल्वेस्थानकाबाहेर सिनेस्टाईल अटक केली. ही माहिती मिळाल्यानंतर दुर्गचे पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी आपले पथक पाठवून नागपूर आरपीएफकडून या दोघांना ताब्यात घेतले.