वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नागपुरातील भर वस्तीत थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 10:02 PM2023-02-18T22:02:58+5:302023-02-18T22:03:24+5:30
Nagpur News वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने भर वस्तीत न्यायालयाने निर्दोष सुटका केलेल्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. घरात घुसून आरोपीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
नागपूर : वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने भर वस्तीत न्यायालयाने निर्दोष सुटका केलेल्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. घरात घुसून आरोपीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्तीच्या पत्नीने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे त्याचा जीव वाचला. बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काछीपुरा येथे ही फिल्मीस्टाईल घटना घडली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.
काछीपुऱ्यातील शिव मंदिराजवळ राहणाऱ्या रामानुज पटेल (४६) याच्यावर हरीश पटेल यांचा खून केल्याचा आरोप होता. दोघेही दूरचे नातेवाईकच होते. या संदर्भात रामानुज व त्याच्या मित्रांविरोधात खुनाचा खटला चालला होता. डिसेंबर, २०२२ मध्ये निर्दोष सुटका झाली होती. कारागृहातून सुटका झाल्यापासून रामानुज मध्य प्रदेशातील रिवा येथील मूळ गावी राहत होता. मुलाच्या शाळेत जायचे असल्यामुळे तो नागपुरात आला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फळे घेऊन तो घरी आला असता, हरीश पटेल यांचा मुलगा सुजल हा घरी आला व त्याने रामानुजला धक्का देऊन पलंगावर खाली पाडले. त्यानंतर, त्याने माझ्या वडिलांना का मारले, असे म्हणत चाकूने वार केले. रामानुज यांच्या पोटावर वार लागला. सुजल आणखी आक्रमक झाला असता, रामानुजची पत्नी मनिषाने त्याला घराबाहेर ढकलले व दरवाजा बंद केला. तिने लगेच पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिस काही वेळातच दाखल झाले व त्यांनी रामानुजला इस्पितळात नेले. मनिषा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुजलविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.