जगण्या-मरण्याचा थरारक संघर्ष अन् मुर्दाड प्रशासनाचा भयावह चेहरा; तो शरिराभोवती ज्वाळा घेऊनच बाहेर आला
By नरेश डोंगरे | Published: June 13, 2024 11:22 PM2024-06-13T23:22:27+5:302024-06-13T23:22:49+5:30
कानाचे पडदे फाडणारा भयानक स्फोट झाला. त्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे पाहून बाजुला काम करणारे कामगार तिकडे धावले. तेवढ्यात ज्वाळा अंगाभोवती लपेटून एक जण जिवाच्या आकांताने धडपडत बाहेर आला अन् समोर येऊन कोसळला.
नागपूर : कानाचे पडदे फाडणारा भयानक स्फोट झाला. त्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे पाहून बाजुला काम करणारे कामगार तिकडे धावले. तेवढ्यात ज्वाळा अंगाभोवती लपेटून एक जण जिवाच्या आकांताने धडपडत बाहेर आला अन् समोर येऊन कोसळला. जेथे स्फोट झाले तेथे अनेक जण कोळसा झाल्यागत पडून होते. काही जण जीवघेण्या वेदनांनी मदतीसाठी ओरडत होते. काळीज हेलावणारे दृष्य होते. त्यामुळे जीवाची बाजी लावून कामगारांनी त्यांना स्फोटाच्या ठिकाणाहून बाहेर काढले. नंतर त्यांना तात्काळ उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिकेसाठी ठिकठिकाणी फोन लावले. मात्र, घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचायला तब्बल पावणेदोन तास लागले. तेवढ्या वेळेत जगण्या-मरण्याचा भयानक संघर्ष आणि मुर्दाड प्रशासनाचा भयावह चेहरा-वजा-पैलू गुरुवारी धामना गावातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कामगारांनी बघितला. त्यांनी त्यासंबंधाने दिलेली माहिती अंगावर काटा उभा करणारी ठरावी.
या कंपनीच्या परिसरात वेगवेगळ्या ईमारतीत वेगवेगळे काम चालते. सेफ्टी फ्यूजचे काम सुरू असलेल्या न्यू मायक्रोकॉड प्लँटमध्ये दुपारी १२.४५ वाजता भीषण स्फोट झाला. त्याची तीव्रता एवढी जास्त होती की ईमारतीच्या स्लॅबचा मधला भाग तुटून खाली पडला. आजुबाजुच्या झाडांना आग लागली. जेथे स्लॅबच तुटून पडली, झाडांना आग लागली तेथे काम करणाऱ्या हाडामासाच्या जिवाचे काय झाले असेल, त्याची कल्पनाच केलेली बरी. दरम्यान, कंपनीच्या दुसऱ्या विभागात यावेळी ७० ते ८० जण काम करीत होते. कान फाडणारे आवाज ऐकून ते सर्व बाहेर आले. जेथे स्फोट झाला, आग जळत होती, अशा ठिकाणाहून एक जण आगीच्या ज्वाळा लपेटून बाहेर धावत आला. त्याला कसेबसे विझवून बाजुला झोपवले. एकाच्या हाताचा पंजा मनगटासह तुटून बाजुला पडला होता. आतमध्ये स्फोटामुळे स्लॅब थोडा थोड पडतच होता अन् आगही सुरू होती. त्यात जिवाच्या आकांताने ओरडणारे सहकारी कामगार बघून जिवाची पर्वा न करता सुदाम कदम, दीपक वासेकर, अविनाश पारधी, नितेश मोदरे, राजू पारधी, किशोर टोंगे या शेरदील कामगारांनी जिवाची पर्वा न करता जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिकेसाठी ठिकठिकाणी फोन लावले. मात्र, नागपूर शहरापासून केवळ २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळी पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला दीड ते पावणेदोन तास लागले. तोपर्यंत जखमी जीव वेदनांनी तडफडत होते. त्यातील सहा वर्षांच्या चिमुकलीची आई असलेली शितल क्षीरसागर चटप 'मला लवकर दवाखान्यात घेऊन चला. खूप वेदना होत आहेत', असे वारंवार ओरडून सांगत होती. तिच्यासारखीच अवस्था बाकी सर्वांची होती, मात्र वेदनांचा अतिरेक होत असल्याने तेे बोलू शकत नव्हते. अखेर सव्वादोन अडीचच्या सुमारास रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोवर शितलसह सहा जणांचे जीव गेले होते.
विशेष म्हणजे, स्फोटकांचे काम चालणाऱ्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका सज्ज असायला हवी. मात्र, ती येथे नव्हतीच. कळस म्हणजे, या घटनेनंतर कंपनी प्रशासनाकडून तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे कसलेही प्रयत्न झाले नव्हते.
ईकडे आक्रोश अन् तिकडचा निरोप
सायंकाळी ६ च्या सुमारास कंपनी परिसरात प्रचंड रोषाचे वातावरण असताना श्रद्धा वनराज पाटील (वय २२, रा. धामना) या तरुणीवर खासगी ईस्पितळातून पैशाअभावी चांगले उपचार होत नसल्याचा निरोप आला अन् नागरिकांच्या रोषाचा भडका उडाला. त्यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी जि.प. अध्यक्ष सुनीता गावंडे यांनी 'तुम्ही उपचार करा', असे म्हणत रुग्णलयात रक्कम जमा केली.
मुलगी अन् वडिल
घरची सांज भागविण्यासाठी शंकरराव अलोने आणि त्यांची मुलगी मोनाली या धोक्याच्या ठिकाणी काम करीत होते. मोनालीची शिफ्ट संपली की शंकरराव कामावर जायचे. आज मात्र स्फोट ऐकून ते कारखान्यात गेले तेव्हा मोनालीचे निर्जिव काळेठिक्कर शरिरच त्यांना बघायला मिळाले.
कसे झाले सुरक्षेचे ऑडिट
स्फोटकांच्या कंपनीत काय सुरक्षा असाव्या, कोणते धोके नसावे, यासाठी वेळोवेळी सुरक्षेचे ऑडिट संबंधित अधिकाऱ्यांकडून केले जाते. जेथे अग्निशमन यंत्रणा अन् आणीबाणीच्या वेळी मदतीची व्यवस्थाच नाही, अशा या कंपनीचे सुरक्षेचे ऑडिट कोणत्या अधिकाऱ्याने केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.