एसटीच्या प्रवासात धडधड अन् खडखड सुरूच; सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना नुसतीच कागदावर
By नरेश डोंगरे | Published: April 29, 2023 05:48 PM2023-04-29T17:48:15+5:302023-04-29T17:48:40+5:30
Nagpur News लालपरीतील संभाव्य बदल तसेच ‘सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना' कागदावरच राहिली आहे.
नरेश डोंगरे
नागपूर : प्रवाशांना सुरक्षित आणि प्रसन्न वातावरणात प्रवास घडविण्यासाठी लालपरी अर्थात एसटी अधिक मजबूत आणि आकर्षक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने चार महिन्यांपूर्वी मंथन केले. त्यासाठी एक अभियान हाती घेण्याचे ठरले. त्यानुसार करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती राज्यातील सर्व आगारप्रमुखांनाही कळविण्यात आली आहे. मात्र, लालपरीतील संभाव्य बदल तसेच ‘सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना' कागदावरच राहिली.
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ नेहमीच वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम राबविते. नवे बदलही महामंडळाकडून केले जाते. मात्र, तिकिटांचे पैसे मोजणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयी आणि आरामदायक प्रवासाची हमी पाहिजे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १५,४०० बसेस आहेत. नागपूर जिल्ह्यात आठ आगार आहेत. या आगाराकडे एकूण ३७५ बसेस आहेत. यातील ७५ टक्के बसेस चांगल्या असल्या तरी उर्वरित २५ टक्के बसेसचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत.
कुण्या बसचे आसन फाटलेले, कुणाचे पत्रे फाटलेले तर कुठल्या पत्र्याचा, आसनाचा नटबोल्ट ढिला झालेला दिसतो. बसचा जागोजागचा रंग निघालेला, पुसट झालेला. त्यामुळे आजारी व्यक्ती जसा अडखळत, कन्हत चालतो. तशा या बस धडधड... खडखड... आवाज करीत प्रवाशांची ने-आण करतात. त्यामुळे अशा बसची संपूर्ण दुरुस्ती करण्याचा निर्णय मुंबईत चार महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. बसची दुरुस्ती, डागडुजी, रंगरंगोटी करून त्यांना आकर्षित करण्याचे ठरले होते.
बसमधील काही प्रवाशांना तंबाखू, पान, खर्याच्या पिचकाऱ्या मारण्याची सवय असते. परिणामी बसमध्ये कोंदट, उग्र दुर्गंध येतो. त्यामुळे आसन व्यवस्था आरामदायक करायची. नियमित स्वच्छता करून बस स्वच्छ अन् चकचकीत करायची, अशी योजना होती. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची अनुभूती मिळेल आणि ते मोठ्या प्रमाणात बसमध्ये येतील, अशी यामागे कल्पना होती. मात्र, चार महिने झाले. ही योजना कागदावरच राहिली.
अधिकाऱ्यांचे मोघम उत्तर
ही योजना प्रत्यक्षात न येण्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता कुणी याबाबत स्पष्टपणे बोलत नाही. मोठी अशी कोणतीही अडचण नाही. प्रवाशांना सुरक्षित, चांगली अन् आरामदाय सेवा देण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच नव्या बसेस प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत, अशी मोघम माहिती एसटीचे अधिकारी देतात.