शिक्षणाच्या माध्यमातून ते घडवितात माणूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 09:17 PM2018-09-04T21:17:31+5:302018-09-04T21:23:02+5:30
सर्वच क्षेत्रात सेवाभाव हरपत चालला असताना सेवानिवृत्तीनंतरही ११ वर्षे वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टरांना चांगला माणूस घडविण्यासाठी एक डॉक्टर झटतो आहे. मेडिकलच्या ‘रेडिओथेरपी अॅण्ड आॅन्कोलॉजी विभागा’चे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे हे ते नाव.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वच क्षेत्रात सेवाभाव हरपत चालला असताना सेवानिवृत्तीनंतरही ११ वर्षे वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टरांना चांगला माणूस घडविण्यासाठी एक डॉक्टर झटतो आहे. मेडिकलच्या ‘रेडिओथेरपी अॅण्ड आॅन्कोलॉजी विभागा’चे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे हे ते नाव.
गरिबांसह आता सामान्यांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील या विभागाच्या उभारणीचे श्रेय त्यानांच जाते. २००७ मध्ये डॉ. कांबळे सेवानिवृत्त झाले. त्यांना गलेलठ्ठ पगार देणाऱ्या नोकरीच्या बाहेर अनेक संधी होत्या. पण, पैशाच्या मागे न धावता मेडिकलमध्येच रुग्ण व विद्यार्थ्यांच्या अध्यापनात ते रमले. त्यांच्याच प्रयत्नामुळे २०११ मध्ये ‘रेडिओथेरपी अॅण्ड आॅन्कोलॉजी विभागा’त पदव्युत्तर शिक्षणाला सुरुवात झाली. एकीकडे कर्करोगाच्या मगरमिठीत अडकलेल्या रुग्णांना सोडविण्याचा ध्यास तर दुसरीकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विषयाचे चांगले शिक्षण देऊन प्रामाणिकपणा, नीतिमत्तेचे धडे देत चांगला माणूस म्हणून डॉक्टर घडविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. कांबळे म्हणाले, शिकविणे हे माझे ‘पॅशन’ आहे. एक उत्तम विद्यार्थी घडविणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती असते. सध्या सर्वच क्षेत्रातील परिस्थिती बदलते आहे. विशेषत: वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. यामुळे ज्ञानासोबतच कौशल्यप्राप्त व सुजाण विद्यार्थी घडविणे हे एक आव्हान ठरत आहे. म्हणूनच अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी स्वत:चा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उभा करणे आवश्यक झाले आहे, तरच मूल्यसंस्कार, जीवनविषयक शिकवण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किक विचारप्रवृत्तीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजतील.