मकरसंक्रांतीच्या माध्यमातून रा.स्व. संघ मतदारांशी ‘धागा’ जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:23 AM2019-01-09T10:23:25+5:302019-01-09T10:31:01+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा शाखांऐवजी शहरातील विविध वस्त्यांमध्ये मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा शाखांऐवजी शहरातील विविध वस्त्यांमध्ये मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपाचे हात मजबूत करण्यासाठी मतदारांशी संवादाचा धागा जोडण्यात येणार आहे, अशीच चर्चा आहे.
संघाकडून विजयादशमीसह गुरुपौर्णिमा, वर्षप्रतिपदा, रक्षाबंधन व मकरसंक्रांत हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. मकरसंक्रांतच्या कार्यक्रमाचे आयोजन संघाच्या शाखांमध्ये करण्याची परंपरा आहे. शाखेतील स्वयंसेवक घरूनच तीळगूळ आणतात व त्याचे वितरण लोकांमध्ये होते. मात्र या वर्षी याचे स्वरूप बदलण्यात आले आहे. आता शाखांच्याऐवजी विविध वस्त्यांमध्ये या उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचणे हा यामागचा उद्देश आहे. २०१९ च्या निवडणुका लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे, असे मानण्यात येत आहे. यासंदर्भात विश्व संवाद केंद्राचे प्रमुख अतुल पिंगळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. संघात उत्सव साजरे केले जातात व जनतेला यात समाविष्ट करून घेण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
२७५ वस्त्यांवर ‘फोकस’
शहरातील सुमारे २७५ वस्त्यांमध्ये मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याची योजना आहे. यात अल्पसंख्यांकबहुल भागांचादेखील समावेश आहे. संघ या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्षात २२० वस्त्यांमधील कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित झाली आहे.
हिंदूंना संघटित करण्याचा दावा
संघाकडून मकरसंक्रांत उत्सवाच्या पत्रिका छापण्यात आल्या आहेत. हिंदूंना संघटित करण्यासाठी संघाकडून नागरिकांच्या वस्त्यांमध्ये मकरसंक्रांत उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, असे यात नमूद आहे.