नागपुरात अनेकांना गंडा घालणारा ठगबाज बिल्डर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:15 AM2019-08-09T00:15:23+5:302019-08-09T00:16:23+5:30
एकाच सदनिकेची अनेकांना विक्री करून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या ठगबाज बिल्डरला गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने अखेर गिट्टीखदान पोलिसांनी आज जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच सदनिकेची अनेकांना विक्री करून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या ठगबाज बिल्डरला गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने अखेर गिट्टीखदान पोलिसांनी आज जेरबंद केले. आरोपी मनीष पद्माकर तम्हाणे (वय ५१, रा. विनायकनगर कामठी रोड) असे त्याचे नाव आहे. सध्या तो गिट्टीखदान पोलिसांच्या कोठडीत आहे.
आरोपी मनीष तम्हाणे याने बोरगावात बहुमजली इमारत बांधली. त्यातील एक सदनिका २०१५ मध्ये समीर निरंजन देवेचा (वय ४०, रा. सुभाषनगर, अंबाझरी) यांनी ९ लाख ५१ हजारात विकत घेण्याचा सौदा केला. रीतसर विक्री करून ताबा घेतल्यानंतर २०१७ मध्ये देवेचा यांच्या आखीवपत्रिकेवर नावही नोंदले गेले. त्यांनी आपल्या सदनिकेचा ताबा घेऊन वापर सुरू केला आणि २०१९ मध्ये ती सदनिका विक्रीला काढली. दरम्यान, त्यांनी सर्च रिपोर्ट काढला असता, ही सदनिका आरोपी तम्हाणे याने साहेबा फिरदोस सय्यद यांना २०१८ मध्ये विकल्याचे उघड झाले. तम्हाणेकडून ही सदनिका विकत घेण्यासाठी साहेबा यांनी २९ लाख रुपये होम लोन घेतले. ही रक्कम आरोपी तम्हाणेने हडपली आणि ती सदनिका मात्र साहेबा यांना दिलीच नाही. विशेष म्हणजे, याच स्कीममध्ये आरोपी तम्हाणेने उमेश पांडे आणि सागर गांधी यांनाही अशाच पद्धतीने सदनिका विकून त्यांची पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली. त्याच्या ठगबाजीविरोधात देवेचा यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. ७ ऑगस्टला ठगबाज तम्हाणेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याची कुणकुण लागताच आरोपी तम्हाणे घरून गायब झाला. त्याला शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सुरेंद्र पांडे यांनी महत्त्वाची भूमिका वठविली. पांडे यांनी गिट्टीखदान पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सकाळी त्याच्या घराजवळून तम्हाणेच्या मुसक्या बांधल्या. गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.