ठगबाज कोंडावारने आणखी एका दाम्पत्याला लावला चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:10+5:302021-05-21T04:09:10+5:30
५९ लाख हडपले : सीताबर्डीत नवीन गुन्हा दाखल -यापूर्वीही अनेक गुन्हे -अटक, २४ पर्यंत पोलीस कोठडी लोकमत न्यूज नेटवर्क ...
५९ लाख हडपले : सीताबर्डीत नवीन गुन्हा दाखल
-यापूर्वीही अनेक गुन्हे
-अटक, २४ पर्यंत पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणारा ठगबाज गोपाल कोंडावार याने पुन्हा एका दाम्पत्याला फसवल्याचे उघड झाले आहे. पीडित दाम्पत्याने त्यांचे ५९ लाख रुपये हडपणाऱ्या कोंडावारविरुद्ध गुन्हे शाखेत तक्रार नोंदवली आहे.
काटोल मार्गावर राहणाऱ्या प्रतिभा नीलकमल महतो (वय ५८) यांच्या तक्रारीनुसार, मे. जगदंबा रियलेटर्स प्रा. लि. चा प्रमुख असलेल्या गोपाल लक्ष्मण कोंडावार याने २९ मार्च २०१४ ला मौजा मांगरूळ येथील त्याच्या कंपनीचे चार भूखंड विकत देण्याचा सौदा केला. तीन वर्षांनंतर हेच भूखंड दुप्पट किमतीत परत विकत घेणार असल्याचे कागदोपत्री करारपत्रही महतो यांना करून दिले. यावेळी आरोपीने बनावट सात बाराही तयार करून दिला होता. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर २०१७ मध्ये महतो दाम्पत्याने कोंडावारला ते भूखंड परत घेऊन आमची रक्कम आम्हाला द्या, असे म्हटले असता तो टाळाटाळ करू लागला. त्याचे वर्तन संशयास्पद असल्यामुळे महतो दाम्पत्याने तलाठ्याकडे सातबारा दाखवला असता तो बनावट असल्याचे आणि आरोपी कोंडावारने महतो यांना विक्री करून दिलेले भूखंड पुन्हा इतर व्यक्तींनाही विकल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महतो दाम्पत्याने कोंडावारकडे पैशासाठी तगादा लावला. तब्बल चार वर्षे त्याने वेगवेगळे कारण सांगून पीडित दाम्पत्यांना टाळले. तो रक्कम परत करणार नाही, हे लक्षात आल्यामुळे प्रतिभा नीलकमल महतो यांनी गोपाल कोंडावारविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. उपलब्ध पुराव्याच्या आधारे पोलिसांनी बुधवारी कोंडावार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा २४ मे पर्यंत पीसीआर मिळवला. उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरयू देशमुख या प्रकरणाचा तपास करीत आहे.
---
विशेष म्हणजे, कोंडावारने अशाच प्रकारे वेगवेगळ्या व्यावसायिकांना भूखंड विकून त्यांच्याकडून लाखो रुपये हडपले आहे. ३६ महिन्यात हेच भूखंड तुमच्याकडून परत विकत घेईल आणि तुम्हाला त्याची दुप्पट रक्कम देईल, असे तो स्टॅम्प पेपरवर लिहून देत असल्यामुळे त्याच्यावर कोणीही विश्वास करत होता. त्याचमुळे त्याने अनेकांचा विश्वासघात करून त्यांची रक्कम हडपली.
---