ठगबाज रामटेके अडकला
By admin | Published: January 6, 2016 03:43 AM2016-01-06T03:43:51+5:302016-01-06T03:43:51+5:30
सर्वसामान्यांना घरकुलाचे स्वप्न दाखवून शेकडो जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा ठगबाज सुचेत ऊर्फ सुचित रामटेके याच्या अखेर धंतोली पोलिसांनी ....
घरकुलाचे स्वप्न : कोट्यवधीचा गंडा
नागपूर : सर्वसामान्यांना घरकुलाचे स्वप्न दाखवून शेकडो जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा ठगबाज सुचेत ऊर्फ सुचित रामटेके याच्या अखेर धंतोली पोलिसांनी मंगळवारी मुसक्या बांधल्या. ग्राहक न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट काढला होता. त्यानुसार, त्याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. धंतोलीतील न्यू इंग्लिश शाळेजवळ एका बहुमजली इमारतीत ठगबाज रामटेकेने मॅट्रिक्स इन्फ्रा नामक कंपनीचे कार्यालय थाटले.
सुलभ किस्तीत आणि स्वस्त किमतीत घर बांधून देण्याचे स्वप्न दाखवत त्याने शेकडो जणांना आपल्या जाळ्यात ओढले. कोट्यवधी रुपये गोळा केल्यानंतर रामटेकेने त्यांना घरे देण्याऐवजी भूलथापा देणे सुरू केले.
टाळाटाळीने नागरिक त्रस्त
नागपूर : वारंवार वेगवेगळ्या थापा मारणारा रामटेके घर देणार नाही, ही कल्पना आल्यामुळे संबंधितांनी आपली रक्कम परत मागणे सुरू केले. रामटेके प्रत्येकाला वेगवेगळी तारीख देऊन रक्कम परत घेण्यासाठी बोलवायचा. स्वत: मात्र कार्यालयात हजर राहात नव्हता. त्याच्या टाळाटाळीला कंटाळून अखेर अनेकांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर रामटेके आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र, त्याला धंतोलीतील काही पोलिसांची साथ असल्यामुळे तो गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाण्याच्या आवारातून सटकला होता. तेव्हापासून तो फरार होता.एकीकडे धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर दुसरीकडे ठगबाज रामटेकेविरुद्ध काहींनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक न्यायालयातही तो हजर राहात नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढला. या पार्श्वभूमीवर, रामटेकेला धंतोली पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. हे कळताच धंतोली ठाण्यात मोठ्या संख्येत पीडित नागरिक गोळा झाले. काहींनी त्याच्या नावाने चांगलाच शिमगा केला. (प्रतिनिधी)