ठगबाज मेटांगळे साथीदारासह गजाआड : २२ मेपर्यंत पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:29 PM2019-05-18T23:29:50+5:302019-05-18T23:30:49+5:30
लकी ड्रॉ आणि भिसीच्या नावाखाली शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेला ठगबाज ज्ञानेश्वर ऊर्फ नानाभाऊ मेटांगळे (वय ६२, रा. लक्ष्मी अपार्टमेंट, अनंतनगर, गिट्टीखदान) आणि त्याचा साथीदार अभिषेक बुरबुरे या दोघांना गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २२ मेपर्यंत पीसीआर मिळवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकी ड्रॉ आणि भिसीच्या नावाखाली शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेला ठगबाज ज्ञानेश्वर ऊर्फ नानाभाऊ मेटांगळे (वय ६२, रा. लक्ष्मी अपार्टमेंट, अनंतनगर, गिट्टीखदान) आणि त्याचा साथीदार अभिषेक बुरबुरे या दोघांना गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २२ मेपर्यंत पीसीआर मिळवला.
२० वर्षांपूर्वी पेन्शननगर-अनंतनगरातून भिसीचा गोरखधंदा सुरू करणाऱ्या मेटांगळेने अडीच वर्षांपूर्वी महालक्ष्मी लकी ड्रॉच्या नावाने गिट्टीखदानमध्ये कार्यालय सुरू केले होते. प्रारंभी छोटे-मोठे दुकानदार, झोपडपट्टीतील गरीब नागरिकांकडून महिन्याला २०० ते ५०० रुपये गोळा करून त्याने भिसी सुरू केली होती. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी तो लकी ड्रॉ काढायचा. विशिष्ट मुदतीनंतर भिसीची एकमुस्त रक्कम हाती पडत असल्याने मेटांगळेकडे रक्कम जमविणाऱ्यांची संख्या वाढत गेली. मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होत गेल्यामुळे त्याने अवैध सावकारीही सुरू केली. ओळखीच्या श्रीमंत व्यक्तीकडून तो २ टक्के व्याजाने रक्कम आणायचा आणि गरजूंना त्यांची निकड पाहून प्रति महिना ५ ते ७ टक्के व्याजाने द्यायचा. आर्थिक व्यवहार वाढल्याने त्याने अभिषेक बुरबुरे नामक साथीदाराकडे तसेच आपल्या काही नातेवाईकांनाही रक्कम जमा करण्याची जबाबदारी सोपविली होती. या सर्वांनी १२ महिने, २४ महिने, ३० महिने अवधीची भिसी चालवणे सुरू केले. दीड हजार रुपयापासून महिन्याला पाच हजार रुपये भिसीत जमा करणाºयांचे वेगवेगळे गटही तयार केले होते. अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरळीत चालल्याने मेटांगळेकडे कोट्यवधींची मालमत्ता जमली होती. मात्र भिसीची रक्कम उचलणाºयांपैकी काही जणांनी नंतर त्याच्याकडे थकीत रक्कम जमा करण्याचे टाळल्याने मेटांगळेचा गोरखधंदा अडखळला. त्यामुळे त्याच्याकडे घेणेकºयांचा तगादा वाढला. परिणामी त्याने योजनाबद्ध पद्धतीने गाशा गुंडाळून तो २५ एप्रिलला सहपरिवार बेपत्ता झाला. मेटांगळेचा पत्ता लागत नसल्याचे पाहून भिसीत रक्कम गुंतविणारे हवालदिल झाले. तिकडे त्याच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार गिट्टीखदान पोलिसांकडे नोंदवली. तर, मेटांगळे आपली रक्कम घेऊन साथीदारांसह पळून गेल्याचे लक्षात आल्याने अनेक गुंतवणूकदारांनी गुरुवारी गिट्टीखदान ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.
पोलिसांनी रामलाल बालराम कनोजिया (वय ५९, रा. अनंतनगर) यांच्या तक्रारीवरून मेटांगळे तसेच बुरबुरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्राथमिक चौकशीनुसार, मेटांगळेने ९२ लाख ३३ हजार, ५०० रुपये हडपल्याची पोलिसांनी नोंद केली. प्रत्यक्षात ही रक्कम कितीतरी पट जास्त असल्याचे सांगितले जाते.
मेटांगळे पळून गेल्याने संबंधित गुंतवणूकदारांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तो लक्षात घेता वरिष्ठांनी गिट्टीखदान पोलिसांना ठगबाज मेटांगळेला तातडीने शोधून काढण्याचे निर्देश दिले. गुन्हे शाखेची पथकेही त्यासाठी कामी लागली होती. पोलिसांनी मेटांगळे आणि त्याच्या नातेवाईक तसेच साथीदारांवर नजर केंद्रित केली. शुक्रवारी सायंकाळी मेटांगळेने त्याचा साथीदार बुरबुरेला वाडी चौकात भेटायला बोलविले. ते माहीत पडताच पोलिसांनी सापळा लावला आणि मेटांगळे-बुरबुरे समोरासमोर येताच या दोघांच्या मुसक्या बांधल्या. आज त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा २२ मेपर्यंत पीसीआर मिळवला.
मेटांगळेकडे कोट्यवधींची मालमत्ता
भिसीच्या गोरखधंद्यातून मेटांगळेने कोट्यवधींची मालमत्ता, दागिने खरेदी केले आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यास या मालमत्तेचा छडा लागू शकतो. यासंबंधाने संपर्क साधला असता गिट्टीखदानचे ठाणेदार सतीश गुरव तसेच तपास अधिकारी संजय अढाव यांनी आम्ही या मालमत्तेचा छडा लावण्याचे प्रयत्न करीत असल्याचे लोकमतला सांगितले. दरम्यान, मेटांगळेला पोलिसांनी अटक केल्याचे कळाल्याने गिट्टीखदान ठाण्यासमोर गुंतवणूकदार गर्दी करू लागले आहेत.