ठगबाजी : अॅड. सतीश उके यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:24 PM2018-08-01T22:24:25+5:302018-08-01T22:28:21+5:30
पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.एस. तोतला यांच्या न्यायालयाने आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.एस. तोतला यांच्या न्यायालयाने आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
आर्थिक गुन्हेशाखेने उके यांना मंगळवारी अटक केली होती. पोलीस लाईन टाकळी राठोड लॉनजवळील रहिवासी शोभाराणी राजेंद्र नलोडे (६०) यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ३१ जुलै २०१८ रोजी सतीश उके, चंद्रशेखर नामदेवराव मते आणि इतरांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४२३, ४२४, ४४७, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ कलमान्वये गुन्हे दाखल करून उके यांना अटक करण्यात आली होती.
उके आणि सहकाऱ्यांनी नलोडे यांच्या मालकीची मौजा बाबूळखेडा खसरा क्रमांक ८२/२ मधील जमीन बनावट दस्तावेजांचा वापर करून हडपली होती. या बनावटगिरीचा प्रारंभ १६ मार्च २००१ पासून झाला होता.
शोभाराणी नलोडे यांचे पती नलोडे यांनी विठ्ठल शंकरराव ढवळे यांच्याकडून १९९० मध्ये ४.७५ एकर जमीन विकत घेतली होती. त्यांनी ऐश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून या जमिनीवर ७८ प्लॉटस्चे ले-आऊट टाकून ते आपल्या सोसायटीच्या सभासदांना विकले होते. त्यानंतर २००१ मध्ये सतीश उके, चंद्रशेखर मते आणि इतरांनी गुन्हेगारी कट रचून या जमिनीचे मूळ मालक ढवळे आणि इतरांच्या नावे बनावट आममुख्त्यारपत्र चंद्रशेखर मते याच्या नावे असल्याचे दर्शविले. मते याच्याकडून२९ नोव्हेंबर १९९० मध्ये ही १.५ एकर जमीन खरेदी केल्याचे खरेदी खत तयार करून १६ मार्च २००१ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी केली.
या जागेवर सोसयटीच्या मूळ भूखंडधारकांना येण्यास मज्जाव करून २० जणांना वेगवेगळे भूखंड विकून टाकले आणि मोठी ठकबाजी केली.
या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ल.श. वर्टीकर यांनी आरोपी उके यांना न्यायालयात हजर केले. सरकारतर्फे १४ दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली. हा गुन्हा जन्मठेप तसेच दहा वर्षांवरील शिक्षेचा असल्याचे सांगण्यात आले. आरोपीकडून गुन्ह्याशी संबंधित दस्तावेज जप्त करून गुन्ह्यात सहभागी आरोपींना अटक करणे आहे. आरोपीच्या वकिलांकडून पोलीस कोठडीस विरोध करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील रत्ना घाटे, आरोपीच्या वतीने अॅड. सुदीप जयस्वाल, अॅड. शशीभूषण वाहणे यांनी काम पाहिले.
सात वर्षांपूर्वीही अटक
उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी सतीश उके आणि त्यांचे बंधू बडतर्फ पोलीस शिपाई प्रदीप उके यांना जमीन ठकबाजीच्या नऊ गुन्ह्यात २०११ मध्ये अटक करण्यात आली होती.