ठगबाज थायलंडमध्ये पळून जाण्याच्या तयारीत

By admin | Published: February 6, 2016 02:59 AM2016-02-06T02:59:12+5:302016-02-06T02:59:12+5:30

नागपूरकरांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारे कथित हिरे व्यावसायिक थायलंडमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

The thugs are ready to flee to Thailand | ठगबाज थायलंडमध्ये पळून जाण्याच्या तयारीत

ठगबाज थायलंडमध्ये पळून जाण्याच्या तयारीत

Next

नरेश डोंगरे नागपूर
नागपूरकरांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारे कथित हिरे व्यावसायिक थायलंडमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. शहर पोलिसांनी या माहितीच्या आधारे आरोपींना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणच्या विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्ट केले आहे.

कृष्णा राजेश चतुर्वेदी आणि मजहर अली बेग अशी या ठगबाजांची नावे आहेत. त्यांनी वर्षभरापूर्वीपासून नागपूरकरांना लुटण्याचे कारस्थान रचले. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रतापनगर चौकातील साई अपार्टमेंटमध्ये पॉश आॅफिस थाटले. त्यांनी येथे प्राईम केस्ट प्रमोशन कंपनी सुरू केली. दोन देखण्या तरुणींसह आणखी पाच ते सात कर्मचारी कामाला ठेवले. सूत्रांच्या माहितीनुसार ते दोघे आपल्या कर्मचाऱ्यांना हिऱ्यांचा व्यापार करीत असल्याचे सांगायचे. चमकदार हिऱ्यांचा कारभार अंधारात चालतो,असे सांगून या व्यवहारात एकाच डीलमध्ये हजारोंचे लाखो आणि लाखोंचे करोडो होतात, असे आरोपी आपल्या कर्मचारी कम एजंटस्ना सांगायचे. जेवढी रक्कम गुंतवू तेवढ्या अधिकपट रक्कम मिळवू, असा विश्वास ते द्यायचे. प्रारंभी एजंट, नंतर त्यांचे नातेवाईक, नातेवाईकांचे मित्र आणि मित्रांचे मित्र असा गोतावळा उभा करून ठगबाज चतुर्वेदी आणि बेगने शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. केवळ २० दिवसात १० चे १५ हजार आणि १ लाखाचे दीड लाख रुपये परत दिले जात असल्याचा भ्रामक प्रचार केल्यामुळे या ठगबाजांच्या कंपनीतील वर्दळ वाढली. सुरूवातील दोन-चार हजारांची रक्कम गुंतवणारांना ते तसा भक्कम परतावा देत असल्यामुळे ही आणि पुन्हा त्यात नवीन मोठी रक्कम ठेवीदार जोडत होते. अशा प्रकारे १२ जानेवारीपासून २० दिवसांकरीता लाखोंची रक्कम गुंतवणारांनी मुदत पुर्ण झाल्यामुळे १ फेब्रुवारीपासून कार्यालयात परतावा घेण्यासाठी चकरा सुरू केल्या. मात्र, त्यांना कार्यालय बंद दिसले.

गुंतवणूकदारांना हादरा
नागपूर : आरोपींनी अंबाझरीत एक पॉश सदनिका भाड्याने घेतली होती, तेथे काही जण जाऊन आले. तेथूनही कंपनीच्या ठगबाजांनी गाशा गुंडाळला होता. हा एकूणच प्रकार गुंतवणूकदारांना हादरा देणारा ठरला.
बंगळूरुहून उडण्याचे संकेत
आरोपी बेगचा एक मित्र पायलट असल्याची माहिती असून, त्याच्या मदतीने आरोपी थायलंडला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण तपास यंत्रणेला लागली आहे. बंगळूरु विमानतळावरून आरोपी ‘उडन छू‘ होण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे येथील पोलिसांनी बंगळूरुसह विविध ठिकाणच्या विमानतळावर आरोपींची माहिती दिली आहे. ठिकठिकाणच्या सुरक्षा यंत्रणांनाही आरोपींची माहिती देण्यात आली असून, ठगबाज चतुर्वेदी आणि बेगच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिसांनी धावपळ तीव्र केली आहे.
कोण आवरणार ठगबाजांना
आर्थिक घोटाळ्यांची राजधानी म्हणून नागपूरचे नाव देशभरात अग्रस्थानी आले आहे. गेल्या दोन वर्षात एक डझनपेक्षा अनेक कंपन्या आणि त्यांच्या सूत्रधारांनी गोरगरीब एजंटस्ला हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांकडून शेकडो कोटी रुपये गोळा केले आहे. त्याच्या पोलीस तक्रारीही झाल्या आहेत. मात्र, तक्रार झाल्यानंतर काही दिवस धावपळ करून पोलीस शांत बसतात. परिणामी उपराजधानीत घोटाळेबाज कंपन्यांचे चांगभले सुरूच आहे. अजूनही शहरात १० ते १५ छोट्यामोठ्या चिटफंड कंपन्या सुरू आहेत.
अशाच पैकी जरीपटक्यातील ज्वेलर्सच्या आडून सुरू असलेल्या सेसवानीच्या चिटफंड कंपनीची गुरुवारी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या व अशा अनेक कंपन्यांकडे पोलीस गंभीरपणे बघायला तयार नसल्याने लोभात पडलेल्या हजारो गुंतवणूकदारांना आपल्या आयुष्याची कमाई गमवावी लागत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The thugs are ready to flee to Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.