तरुणाची थरारक हत्या

By Admin | Published: October 28, 2015 02:58 AM2015-10-28T02:58:46+5:302015-10-28T02:58:46+5:30

कळमन्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करून मारेकऱ्यांनी मृतदेह जाळला. मंगळवारी सकाळी ही थरारक घटना उघडकीस आल्यामुळे ..

Thunderbolt murder of the youth | तरुणाची थरारक हत्या

तरुणाची थरारक हत्या

googlenewsNext

शस्त्राचे घाव घातले : मृतदेह पेट्रोलने जाळला, मृत अन् मारेकरी अज्ञात
नागपूर : कळमन्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करून मारेकऱ्यांनी मृतदेह जाळला. मंगळवारी सकाळी ही थरारक घटना उघडकीस आल्यामुळे नागेश्वरनगर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, मारेकऱ्यांनी आधी या तरुणाच्या गळ्यावर, डोक्यावर, पोटावर धारदार शस्त्राचे घाव घातले. नंतर मृताची ओळख पटू नये म्हणून त्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकले.
मंगळवारी सकाळी कळमन्याच्या नागेश्वरनगरात (पारडी नाका नं. ५) रेल्वे लाईनजवळ एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह पडून होता. नागरिकांनी ही माहिती कळमना पोलिसांना दिली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. मृत अंदाजे ३५ वयोगटातील होता. त्याच्या गळ्यावर, मानेवर, डोक्यावर आणि पोटावर धारदार शस्त्रांचे घाव होते. तर, मृतदेह अर्धवट जळाला होता. पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू झाले.
या भागातील एका वृद्धेचा लखन ऊर्फ लारा नामक मुलगा (वाहनचालक) सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता असल्याचे कळाल्याने पोलिसांनी धावपळ करून त्या वृद्धेला घटनास्थळी आणले. मृतदेह पाहून वृद्धेने हंबरडा फोडला. त्यामुळे पोलिसांनी लारा ज्याच्याकडे काम करतो, त्या ट्रकचालकाकडे संपर्क केला. संपर्क होत नसल्यामुळे पोलिसांचा संशय पक्का झाला.(प्रतिनिधी)

तो ‘लखन‘ नव्हेच !
दुपारी ट्रकमालकाशी संपर्क झाला. लखन आपल्यासोबत असून आम्ही पंजाबकडे जात असल्याचे ट्रकमालकाने सांगितले. ‘त्या‘ तरुणाचे बोलणेही करून दिले. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले. वृद्धेचाही आक्रोश थांबला. तो मृतदेह कुणाचा आहे आणि त्याची हत्या करणारे कोण, त्याची पुन्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र, वृत्तलिहिस्तोवर ते स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, ज्या पद्धतीने मारेकऱ्यांनी ही हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न केले, ते पाहता हे सराईत गुन्हेगारांचे काम असावे, असा कयास आहे. मारेकऱ्यांनी हत्या दुसरीकडे केली असावी आणि मृतदेह पारडी नाक्याजवळ आणून फेकला असावा, असाही संशय घेतला जात आहे. ठाणेदार सुनील बोंडे आणि त्यांचे सहकारी या थरारक हत्याकांडाचा तपास करीत आहेत.

Web Title: Thunderbolt murder of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.