जाेराचे वादळ, गारपीटीसह अवकाळी पावसाचे थैमान
By निशांत वानखेडे | Published: May 7, 2024 07:17 PM2024-05-07T19:17:42+5:302024-05-07T19:18:24+5:30
Nagpur : नागपूर जिल्ह्यात विज पडून तीन बैल ठार; झाडे पडली, हाेर्डिंग फाटले, तार तुटले
नागपूर : वेधशाळेच्या अंदाजानुसार मंगळवारी सायंकाळच्या सुमारात जाेराच्या वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यात चांगलेच थैमान घातले. अनेक भागात गारपीट झाली. भिवापूर तालुक्यात एक बैलजाेडी व रामटेक तालुक्यात एक बैल विज पडून ठार झाला. नागपूर शहरातही जाेरदार वादळाने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली, हाेर्डिंग फाटले, विजेचे तार तुटले व टीनही उडाले.
हवामान विभागाचा अंदाज मंगळवारी खरा ठरला. आठवडाभर नागरिक उन्हाने हाेरपळल्यानंतर मंगळवारी पहाटे वातावरणाने कुस बदलली. पहाटे ३ वाजतापासून वादळासह हलक्या पावसाने हजेरी लावली. सकाळपासून मात्र ढगांच्या उपस्थितीत पुन्हा सूर्याचा ताप वाढला. दुपारपर्यंत उन-सावलीचा खेळ सुरू राहिला. दुपारी ३ वाजतापासून वातावरण पुन्हा बदलले. रामटेक तालुक्यात ३.३० वाजतापासून ढगांचा गडगडाटासह जाेराचे वादळ सुरू झाले. माैदा तालुक्यातही वादळासह अर्धा-पाऊन तास गारपीटीसह पावसाच्या सरी बरसल्या. भिवापूर तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा बसला. पांजरेपार गणपत लांबट या शेतकऱ्याच्या शिवारात चार बैल व गायी बांधून हाेत्या. अचानक वीज पडल्याने त्यातील दाेन बैल ठार झाले. दुसरीकडे खातखेडा येथे वीज पडून एक म्हैस मृत्युमुखी पडली व एक बैल जखमी झाला. दुसरीकडे रामटेक तालुक्यात मांगली शिवारात वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यु झाला.
पावसासह आलेले साेसाट्याचे वादळ इतके वेगात हाेते की त्यामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. नागपूर शहरात सिव्हिल लाईन्स व गंजीपेठ येथे झाडे काेसळली. अनेक ठिकाणी झाेपड्यांच्या छतावरील टीन उडल्याच्याही घटना घडल्या. हाेर्डिंगवरचे टीन व कपड्याचे बॅनरही फाटून हवेत उडाले, ज्यामुळे विजेची तारे तुटल्याने काही भागातील विज पुरवठा बंद पडला. उत्तर व पूर्व नागपुरात गाराही पडल्या.
सायंकाळी कार्यालयीन सुटीच्या वेळी झालेल्या या वादळी पावसाने चाकरमान्यांची भलतीच तारांबळ उडाली. वादळामुळे दुचाकी वाहनांचे संतुलन बिघडल्याने वाहनचालक पडल्याची माहिती समाेर आली आहे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाने भीतीदायक स्थिती झाली हाेती. सायंकाळच्या पावसाने दिवसभराच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला.
पारा घसरला
पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मंगळवारी नागपूर शहराचे दिवसरात्रीचे तापमान ४ अंशाच्या फरकाने खाली घसरले. साेमवारी ४२.६ अंशावर असलेले कमाल तापमान मंगळवारी ४.५ अंशाने घसरून ३८.१ अंशावर पाेहचले, जे सरासरीपेक्षा ४.३ अंशाने कमी आहे. किमान तापमानही ४.२ अंशाने घसरून २३.५ अंशावर खाली आले. पावसाळी वातावरणामुळे दिवसभराचा उकाडा बऱ्याच अंशी कमी झाला व वातावरण आल्हाददायक झाले.