सकाळी गडगडाटी पावसाचा खेळ; दिवसभर मात्र उकाड्याचा छळ !

By निशांत वानखेडे | Published: October 19, 2024 06:31 PM2024-10-19T18:31:37+5:302024-10-19T18:41:15+5:30

दिवस-रात्रीचा पारा उसळीवरच : पुढचे दाेन दिवस विजा, गडगडाट व पाऊस

Thunderstorms in the morning but The whole day the torture of heat! | सकाळी गडगडाटी पावसाचा खेळ; दिवसभर मात्र उकाड्याचा छळ !

Thunderstorms in the morning but The whole day the torture of heat!

नागपूर : ऑक्टाेबर हीटमुळे दिवसरात्र उकाड्याचा सामना करणाऱ्या विदर्भात शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपर्यंत गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्याने गारव्याची अनुभूती झाली. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही व दुपार हाेता हाेता आकाशातून ढगांची गर्दी हटून सूर्याचा ताप वाढला. त्यामुळे नागरिकांना नेहमीप्रमाणे उकाड्याचा छळ सहन करावा लागला.

दसरा उलटून गेल्यानंतरही लाेकांना थंडीचा लवलेश जाणवला नाही. उलट ऑक्टाेबरचा पारा उन्हाळ्यासारखा जाणवायला लागला आहे. १० ते १२ ऑक्टाेबरदरम्यान पावसाने हजेरी लावली; पण उकाड्याचा त्रास कमी झाला नाही. दरम्यान, हवामान विभागाने शनिवारपासून (दि. १९) विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला हाेता. त्यानुसार शुक्रवारी रात्रीच नागपूरसह अमरावती, बुलढाणा, गडचिराेली, यवतमाळ या भागात चांगला तर अकाेल्यात थाेड्या प्रमाणात पाऊस झाला.

नागपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी मेघगर्जनेसह अनपेक्षितपणे पावसाने हजेरी लावली. सकाळपर्यंत ६.८ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याचा सामना करणाऱ्या नागपूरकरांची सकाळ गारवा देणारी ठरली. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. १० वाजेपर्यंत पावसाळी वातावरण ओसरून पुन्हा ढगांच्या आडून सूर्यदर्शन घडले. पुन्हा उकाड्याचा त्रास सुरू झाला व यावेळी वातावरणात आर्द्रता असल्याने उकाड्याची तीव्रता अधिकच वाढल्याचे जाणवले. दिवसाचा पारा अंशत: चढून ३४.६ अंशावर पाेहोचला. दुसरीकडे रात्रीचाही पारा सरासरीच्या ४ अंशाने अधिक नाेंदविले. ब्रह्मपुरीत सर्वाधिक ३७.२ अंश व त्याखालाेखाल अकाेल्यात ३६.७ अंशाची नाेंद झाली. इतर शहरांचे तापमानही ३३ ते ३५ अंशादरम्यान आहे.

दरम्यान, अरबी समुद्र व बंगालच्या खाडीत बदलत्या परिस्थितीमुळे २० व २१ ऑक्टाेबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र थंडीची चाहूल कधी जाणवेल, ही प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.

Web Title: Thunderstorms in the morning but The whole day the torture of heat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.