जन्मत:च थायरॉईड चाचणी गरजेची : डॉ. वामन खाडीलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 07:10 PM2018-01-04T19:10:33+5:302018-01-04T19:20:12+5:30
मातेला थायरॉईड नसेल तरी मुलांमध्ये थायरॉईड असू शकते, अशी माहिती देशातील पहिले ‘पेडियाट्रिक इंडोक्रिनोलॉजिस्ट’ डॉ. वामन खाडीलकर यांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : मूल जन्मत:च त्याचे लसीकरण जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच त्याची थायरॉईडची चाचणी करणे आवश्यक आहे. कारण, बाळ तीन महिन्यांचे होईपर्यंत आणि आजाराची लक्षणे दिसून येईपर्यंत मेंदूचे बरेच नुकसान झालेले असते. विशेष म्हणजे, आजही अनेकजण थायरॉईड हा आनुवांशिक आजार आहे असे मानतात. यामुळे गर्भवतीला थायरॉईड असेल तेव्हाच जन्मलेल्या बाळाची तपासणी करतात. परंतु असे नाही, मातेला थायरॉईड नसेल तरी मुलांमध्ये थायरॉईड असू शकते, अशी माहिती देशातील पहिले ‘पेडियाट्रिक इंडोक्रिनोलॉजिस्ट’ डॉ. वामन खाडीलकर यांनी दिली.
बालरोग अकादमीच्यावतीने गुरुवारपासून रेशीमबाग परिसरात ५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. लहान ‘मुलांची वाढ व हार्माेन्सचे विकार’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
पत्रकारांशी बोलताना डॉ. खाडीलकर म्हणाले, भारतात लहान मुलांमध्ये ‘थायरॉईड’चे प्रमाण दोन हजार मुलांमागे एक मूल, असे आहे. परंतु हेच प्रमाण दक्षिण भारतात दोन हजार मुलांमागे दोन मुले असे आहेत. कारण या भागात रक्ताच्या नातेसंबंधात लग्न केले जाते. परंतु थायरॉईड हा आजार कुणालाही होऊ शकतो. यामुळे जन्मत:च ‘युनिटल थायरॉईड चाचणी’ फार महत्त्वाची ठरते. यावेळी परिषदेचे मीडिया कॉर्डिनेटर डॉ. अविनाश गावंडे व डॉ. सुचित बागडे उपस्थित होते.
२५ वर्षानंतर मुलांची उंची, वजन व स्थुलतेचा चार्ट
डॉ. खाडीलकर म्हणाले, मुलांची उंची, वजन व स्थुलतेला घेऊन प्रमाणबद्ध चार्ट नव्हता. २५ वर्षांनंतर म्हणजे २०१५ मध्ये हा चार्ट तयार करण्यात आला. यामुळे योग्य वयात मुलाची उंची बरोबर आहे किंवा नाही. किंवा जास्त उंची आहे. वजन योग्य आहे किंवा नाही त्याचे निदान करणे शक्य झाले आहे. विशेषत: या चार्टमधून मुलांच्या स्थुलतेकडेही लक्ष ठेवून तसे उपचार करून भविष्यातील अनेक आजार टाळता येतात.
शहरातील २० टक्के मुले लठ्ठ
डॉ. खाडीलकर म्हणाले, लठ्ठपणा म्हणजे शारीरिक बेढबपणा नाही तर तो एक रोग आहे. शहरात लहान मुलांमध्ये २० टक्के मुले ही लठ्ठ आहेत. यातील पाच टक्के मुलांमध्ये अतिलठ्ठपणा दिसून येतो. यामागील कारण म्हणजे, शाळेत आठ तास घालविल्यानंतर चार तास शिकवणी वर्गात तर उर्वरित तीन तास ही मुले संगणक, टीव्ही किंवा मोबाईलवर खेळत असतात. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत असल्याने लठ्ठपणाचा आकडाही वाढत आहे.
लठ्ठपणामुळे मुलांमध्ये वाढतोय मधुमेह
गेल्या चार दशकांमध्ये लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण तब्बल दहापटीने वाढले आहे. भारतातही लठ्ठ मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. मुलांमधील लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. इन्सुलिन घेण्याची गरज निर्माण होते.
व्हिटॅमिन डीसाठी दुपारचे ऊन अंगावर पडू द्या
मुलांमधील व्हिटॅमिन डी यावर प्रकाश टाकताना डॉ. खाडीलकर म्हणाले, लहान मुलांचा दिवस शाळेत, शिकवणी वर्ग आणि घरातच जास्त जातो. मुलांच्या व्यस्ततेमुळे आहाराकडेही दुर्लक्ष होते. परिणामी, ‘व्हिटॅमिन डी’ची कमी अनेकांमध्ये दिसून येते. यासाठी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंतचे ऊन अंगावर पडू द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
आई-वडिलांपूर्वी मुलांच्या मृत्यूचा धोका
डॉ. खाडीलकर म्हणाले, अयोग्य जीवनशैली आपण आत्मसात केली आहे. जंक फूडचे सेवन वाढले आहे तर दुसरीकडे ‘हायजेनिक’ म्हणून बाटलीबंद पाण्याचे सेवनही वाढले आहे. याच्या सोबतीला संगणक, लॅपटॉप, स्मार्ट मोबाईलवर तासन्तास वेळ घालविला जात आहे. परिणामी, मुलांमध्ये लठ्ठपणा व हृदयाचे आजार वाढले आहेत. यामुळे आई-वडिलांच्या मृत्यूपूर्वी या पिढीचा मृत्यू होण्याचा धोका वाढला आहे.