‘ती’ वाघिण जाई की जुई?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 08:35 PM2018-03-30T20:35:47+5:302018-03-30T20:39:24+5:30
महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील वाघिणीचा गुरुवारी आजाराने मृत्यू झाला. मृत वाघिण ही जाई होती. परंतु महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रशासन सांभाळणाऱ्या कृषी महाविद्यालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करून जुईचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे ती वाघिण नेमकी कोण होती, हे महाराज बाग प्रशासनाला माहीत होते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील वाघिणीचा गुरुवारी आजाराने मृत्यू झाला. मृत वाघिण ही जाई होती. परंतु महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रशासन सांभाळणाऱ्या कृषी महाविद्यालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करून जुईचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे ती वाघिण नेमकी कोण होती, हे महाराज बाग प्रशासनाला माहीत होते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आईपासून दुरावलेल्या जाई व जुई या दोन वाघिणींना नोव्हेंबर २००८ साली मेडकी, जि. चंद्र्रपूर येथील जंगलातून आणण्यात आले होते. तेव्हापासून गेली १० वर्षे या दोघी महाराज बाग प्राणिसंग्रहालयात होत्या. यापैकी जुईचा मृत्यू अगोदरच झाला. जुईच्या मृत्यूनंतर जाई महाराज बागेतील आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनली होती. ५ नोव्हेंबर २०१७ रोजी साप चावल्यामुळे ती आजारी पडली. महाराज बाग , कृषी महाविद्यालय प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून जाईला जिवंत ठेवले. १७ नोव्हेंबरला विविध तपासणी अहवालातून तिचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. महाराजबाग प्रशासनातर्फे तिच्यावर दिवसरात्र उपचार सुरु होते. या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळाले. जाईच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा दिसून आली. त्यानंतर तिला १२ मार्च रोजी मोठ्या पिंजऱ्यात हलविण्यात आले आणि आवश्यक ते उपचार सुरु केले. परंतु २५ मार्च रोजी तिची प्रकृती खाल्यावल्यामुळे तिला प्राणिसंग्रहालयाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. परंतु २९ मार्च रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान जाईचा मृत्यू झाला. या घटनेने महाराज बाग परिसरात शोककळा पसरली. सकाळी ११.३० वाजता तिचे शवविच्छेदन झाले. शवविच्छेदनानंतर दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास प्राणिसंग्रहालय परिसरात अग्नि देऊन अंत्यविधी करण्यात आला. मरणारी वाघिण ही जाई असल्याने तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह प्रसिद्धी माध्यमानांही माहीत होते. परंतु महाराज बागेचे प्रशासन सांभाळणाऱ्या कृषी महाविद्यालयाला मात्र याची माहिती नव्हती.
कारण गुरुवारी दुपारीच कृषी महाविद्यालयाच्यावतीने याबाबत एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले. त्यात जुई वाघिणीचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे काही वेळ संभ्रम निर्माण झाला. परंतु प्रसिद्धी माध्यमांना मृत वाघिण जाई असल्याचे माहीत असल्याने नावात गडबड झाली नाही. परंतु या घटनेने महाराज बागेचे प्रशासन सांभाळणारे कृषी महाविद्यालय महाराज बाग प्राणिसंग्रहालयाबाबत किती गंभीर आहे, हे दिसून आले.
प्रिंटिंग मिस्टेक
यासंदर्भात कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि महाराज बाग प्रशासनाचे प्रमुख डॉ. एन. डी पार्लावार यांना विचारणा केली असता त्यांनी ती वाघिण जाई असल्याचे स्पष्ट केले. कृषी महाविद्यालयाने पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकात चुकीचे नाव छापल्याचे मान्य करीत ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाल्याचे सांगितले.