नागपुरात तिबेटियन महिलांनी काढला शांतिमार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:47 AM2019-04-26T00:47:37+5:302019-04-26T00:48:33+5:30
तिबेटी धर्मगुरू अकरावे पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी, या मागणीसाठी तिबेटियन महिला असोसिएशनतर्फे गुरुवारी नागपूर ते रायपूर(छत्तीसगड)पर्यंत शांतिमार्च काढण्यात आला. असाच शांतिमार्च आज देशातील विविध भागातूनही काढण्यात आला. संविधान चौकात पंचेन लामा यांचा ३० वा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिबेटी धर्मगुरू अकरावे पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी, या मागणीसाठी तिबेटियन महिला असोसिएशनतर्फे गुरुवारी नागपूर ते रायपूर(छत्तीसगड)पर्यंत शांतिमार्च काढण्यात आला. असाच शांतिमार्च आज देशातील विविध भागातूनही काढण्यात आला. संविधान चौकात पंचेन लामा यांचा ३० वा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
तिबेटियन महिला असोसिएशनच्या सचिव डोलमा त्सिरिंग यांच्या नेतृत्वात दुपारी २ वाजता महिलांनी संविधान चौकातून रायपूर (छत्तीसगड)पर्यंत शांतिमार्चला सुरुवात केली. हा संपूर्ण शांतिमार्च पायी पूर्ण करण्यात येणार आहे. ६ मे रोजी महिला रायपूरला पोहोचतील. तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या शांतिमार्चचा समारोप केला जाईल.
डोलमा यांच्यानुसार नागपूरप्रमाणेच हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा ते चंदीगड, डेहराडून ते दिल्ली, गंगटोक ते सालुगांढा आणि म्हैसूर ते बंगळुरूपर्यंत तिबेटियन महिला शांतिमार्च करीत आहेत.
त्यांनी सांगितले की, १९८९ मध्ये १० वे पंचेन लामा लोबसंग थिन्ले लुहडुपचोकई ग्यालत्सेन यांच्या मृत्यूनंतर १९९५ मध्ये महामहीम दलाई लामा यांनी ६ वर्षाच्या गेडन चोकई नीमा यांना ११ वे पंचेन लामा म्हणून घोषित केले होते. यानंतर चीन सरकारने पंचेन लामाचे अपहरण केले. त्यांच्या परिवारातील सदस्यांसोबतच ताशी लुहम्मो मठाचे मठाधीश जाद्रेललाही ताब्यात घेण्यात आले. तेव्हापासून त्यांचा कुठलाही पत्ता नाही. तेव्हापासून तिबेटियन महिला सातत्याने जागृती अभियान राबवून अकरावे पंचेन लामा यांच्या सुटकेसाठी संयुक्त राष्ट्रसंघासह जगातील विविध देशांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.