नागपूर रेल्वे स्टेशनवर तिकीट दलालाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:15 AM2019-05-08T00:15:15+5:302019-05-08T00:16:24+5:30
रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील गेटवर मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी चौकशीदरम्यान एका तिकीट दलालाला तिकिटासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून १०५० रुपयाचे एक तिकीट जप्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील गेटवर मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी चौकशीदरम्यान एका तिकीट दलालाला तिकिटासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून १०५० रुपयाचे एक तिकीट जप्त करण्यात आले.
निरीक्षक यशोदा यादव, उपनिरीक्षक के. एन. राय, एच. एल. मीणा, बी. एस. बघेल व अनिल उसेंडी आदींनी संशयित व्यक्तीची चौकशी केली. त्याने आपले नाव मन्सूर शेख (२९) असे सांगून भरतवाडा येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याने रेल्वे क्रमांक १५६४५ चे प्रीमियर तात्काळ तिकीट दाखविले. ३०० रुपये कमिशन घेऊन गरजू प्रवाशाला हे तिकीट देणार असल्याची माहिती त्याने दिली.
तिकीट खरेदी व विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वैध परवानगी नसल्याच्या कारणामुळे त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
उन्हाळ्याच्या दिवसात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. यादरम्यान तिकिटांचा काळाबाजार केला जातो. याला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांचे पथक रेल्वे स्टेशनवर तिकिटांची दलाली करणाऱ्यांवर नजर ठेवून आहे.