गोंडवाना, इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये तिकिट तपासणी मोहिम; २४६ जणांना दंड, ७५३६५ रुपये वसूल
By नरेश डोंगरे | Published: July 1, 2023 06:01 PM2023-07-01T18:01:17+5:302023-07-01T18:02:42+5:30
विनातिकिट आणि साधे तिकिट घेऊन एसी कोच मध्ये प्रवास करणारे २४६ प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांच्या हाती
नरेश डोंगरे
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून शुक्रवारी नागपूर - डोंगरगड - दुर्ग रेल्वे मार्गावर विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. यात विनातिकिट आणि साधे तिकिट घेऊन एसी कोच मध्ये प्रवास करणारे २४६ प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांच्या हाती लागले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या मार्गावर तिकिट तपासणीची विशेष मोहिम राबविली जात आहे. शुक्रवारी ३० जूनला नागपूर पासून डोंगरगड आणि दुर्गपर्यंत ट्रेन नंबर १२४१० गोंडवाना एक्सप्रेसमध्ये, १२१०६ विदर्भ एक्सप्रेस तसेच १२८५६ इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये ही मोहिम राबविण्यात आली. त्यात रेल्वे अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पथकांनी अचानक या गाड्यांच्या कोचमध्ये शिरून प्रवाशांचे तिकिट तपासले. त्यात २४६ प्रवासी असे आढळले की त्यांच्यातील काहींकडे तिकिटच नव्हते. तर, काहींकडे साधे तिकिट असूनही ते आरक्षित कोचमध्ये प्रवास करीत होते. या सर्वांवर रेल्वे अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंडापोटी ७५,३६५ रुपये वसूल करण्यात आले.