महामेट्रोच्या १५ स्टेशनवरील तिकिट काउंटर बंद; इएफओ काउंटरमधून देताहेत तिकिट
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 5, 2024 10:36 PM2024-02-05T22:36:30+5:302024-02-05T22:36:41+5:30
कार्डधारक प्रवाशांना त्रास
नागपूर : गेल्या पाच वर्षांपासून महामेट्रोने नेमून दिलेल्या स्वतंत्र काउंटरद्वारे तिकिटांचे वाटप करण्यात येते. पण गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जवळपास १५ स्टेशनवरील नियमित काउंटर बंद करून ग्राहक सेवा केंद्रामधून (इएफओ) नियमित तिकिट देण्याचे आदेश महामेट्रोच्या ऑपरेशन अॅण्ड मेन्टेनन्स या विभागाकडून स्टेशन नियंत्रकांना देण्यात आले आहे. या आदेशाचा कार्डधारक प्रवाशांना त्रास होत आहे.
या संदर्भात नागपूर मेट्रो रेल्वे कंत्राटी कर्मचारी संघाने महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांना पत्र लिहून तिकिट विक्री व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली आहे. इएफओचा वापर आकस्मिक वेळेत करण्यात येतो. प्रत्येक स्टेशनवर कर्मचारी उपलब्ध असतानाही एकच इएफओ काउंटर सुरू ठेवणे आणि प्रवाशांची गैरसोय करणे हे शासकीय नियमानुसार चुकीचे आणि अन्यायकारक आहे. लेखी तक्रारीनंतरही प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. ऑरेंज लाईनवर छत्रपती चौक, रहाटे कॉलनी, जयप्रकाशनगर, कडबी चौक, गड्डीगोदाम, नवीन विमानतळ, विमानतळ, अजनी चौक, शून्य मैल, नारी रस्ता आणि अॅक्वा लाईनवर एलएडी, बन्सीनगर, शंकरनगर स्टेशनवर तिकिट विक्री बंद आहे.
आता मेट्रोतून शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि नोकरी करणारे सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. मेट्रोच्या आदेशाचा सर्वांनाच त्रास होत आहे. या संदर्भात अनेक प्रवाशांनी लेखी तक्रार नोंदविली आहे. त्यानंतरही मेट्रो प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत घसरण होत असल्याचा आरोप संघाचे अध्यक्ष महेश खांदारे आणि सचिव महामंत्री नितीन कुकडे यांनी केला आहे.