नागपूर मनपाच्या ‘आपली बस’मध्ये तिकीट घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 09:43 PM2018-01-04T21:43:03+5:302018-01-04T21:56:02+5:30
महापालिकेच्या शहर बसमधून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्यासाठी परिवहन विभागातर्फे ‘स्मार्ट कार्ड ’उपलब्ध केले जाते. कंडक्टरांनी या स्मार्ट कार्डचा गैरवापर करून लाखो रुपयांचा तिकीट घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महापालिकेच्या शहर बसमधून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्यासाठी परिवहन विभागातर्फे ‘स्मार्ट कार्ड ’उपलब्ध केले जाते. कंडक्टरांनी या स्मार्ट कार्डचा गैरवापर करून लाखो रुपयांचा तिकीट घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. तिकीट मशीन खरेदीचा घोळ गाजत असतानाच तिकिटांचा घोटाळा पुढे आल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.
महापालिकेने ‘आपली बस’ शहर बससेवा सुरू केली आहे. बस वाहतुकीचे संचालन मार्च २०१७ पासून कंत्राटदारांमार्फत केले जात आहे. कंडक्टर तिकीट विक्रीच्या माध्यमातून येणारा पैसा जमा करतात. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी डी.आय.एम.टी.एस., मे. युनिटी सिक्युरिटी फोर्स, मे.सिक्युरिटी अॅन्ड इंटीलिजन्स या कंपन्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतरही जून २०१७ पासून स्मार्ट कार्डच्या माध्यमातून तिकीट घोटाळा सुरू असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे महापालिकेला १२ ते १३ लाखांचा फटका बसला आहे.
या घोटाळ्यात ६० कंडक्टर सहभागी आहेत. यातील ३५ जणांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु यात सहभागी असलेले पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांवर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी अद्याप कोणत्याही स्वरूपाची कारवाई केलेली नाही. याची गंभीर दखल घेत परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी या प्रकरणात सहभागी असलेले कं डक्टर, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांना निलंबित करून दोषींच्या विरोधात पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल करा. अपहाराची रक्कम वसूल करून याबाबतचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत.
असा झाला घोटाळा
विद्यार्थी, दररोज प्रवास करणारे नोकरदार यांना परिवहन विभागाने पास स्वरूपात स्मार्ट कार्ड उपलब्ध केले आहे. हे कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा आहे. प्रवास करताना कंडक्टरला कार्ड दिल्यानंतर तो मशीनमध्ये स्वाईप करून तिकीट देतो. परंतु काही कंडक्टरकडे मोठ्या प्रमाणात हे कार्ड आढळून आले आहे. कार्डधारक प्रवास करीत नसला तरी त्याचे कार्ड स्वाईप करून प्रवाशांना तिकीट देऊन दररोज दीड ते दोन लाखांचा अपहार केला जात असल्याचा अंदाज आहे. ६० कंडक्टरकडे असे अनेक स्मार्ट कार्ड आढळून आले आहेत.
स्मार्ट कार्ड वितरित करणारेही सहभागी?
परिवहन विभागामार्फत वितरित करण्यात आलेल्या स्मार्ट कार्डचा दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. स्मार्ट कार्ड कुणी वितरित केले. कंडक्टरला स्वाईप मशीन कुणी दिल्या. एका स्मार्ट कार्डचा दिवसभरात कितीवेळा वापर करण्यात आला, याची तपासणी करण्याची जबाबदारी स्मार्ट कार्ड वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे या घोटाळ्यात संबंधित अधिकारी सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घोटाळेबाजांवर कारवाई का नाही?
स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सुरू असलेला तिकीट घोटाळा उघडकीस आल्यानंतर काही कंडक्टरला निलंबित करण्यात आले. परंतु स्मार्ट कार्ड कुणी उपलब्ध केले. ते कंडक्टरकडे कसे आले. यात अधिकारी सहभागी आहेत का, याचा शोध घेण्यासाठी विभागीय चौकशी होण्याची अपेक्षा होती. मात्र परिवहन विभागाने कारवाई करण्याचे टाळले. यामुळे संशय वाढला आहे.