तिकीट चोरी ; २२ कंडक्टर बडतर्फ : मनपा परिवहन विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 09:38 PM2020-02-05T21:38:34+5:302020-02-05T21:39:29+5:30
महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. कंडक्टर व चालकांचे रॅकेट सक्रीय असल्याने महापालिकेला दर महिन्याला ६ कोटींचा फटका बसतो. याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने तिकीट तपासणीची धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली.
भरारी पथकांच्या तपासणीत ८१कंडक्टरने प्रवाशांकडून पैसे घेतल्यानंतरही तिकटी न दिल्याचे आढळून आले. २ कंडक्टरकडे तिकीटाहून अधिक रक्कम आढळून आली. तर २२ कंडक्टर व्हॉट्स अॅप गु्रत चालवित असल्याचे निदर्शनास आले. यासर्वावर कारवाई करण्यात आली. भरारी पथकाची कारवाई निरंतर सुरू राहणार आहे. मनपा व डिम्स कंपनीचे तिकीट निरीक्षकांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू राहणार आहे.
दरम्यान परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी बुधवारी मोरभवन येथे शहर बसची तपासणी केली. मोरभवन येथे बसून असलेल्या सर्व प्रवाशांना बस सुटण्यापूर्वी डेपोतच तिकीट देण्याचे निर्देश दिले. प्रवाशांनी कडंक्टरला पैसे दिल्यानंतर त्यांच्याकडे तिकीटांची मागणी करावी. असे आवाहन बोरकर यांनी केले आहे.
मोरभवन आणि महाराजबाग येथे स्पॉट बुकींगसाठी प्रत्येकी १० कंडक्टर ठेवण्याचे निर्देश कंडक्टरची नियुक्ती करणाऱ्या कंपनीला दिले. तसेच डिझेल बस ऑपरेटरला मोरभवन आणि महाराजबाग येथे प्रत्येकी दोन कंट्रोलर नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बोरकर यांनी दिली.
धमकावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार
तिकीट चोरी रोखण्यासाठी परिवहन विभागातर्फे व प्रोग्राम मॅनेजर मे.डिम्ट्स यांच्यातर्फे बस तपासणी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके शहरातील विविध भागात बसची तपासणी करतात. परंतु तपासणीकांना तिकीट चोरीतील रॅकटकडून धमक्या दिल्या जातात. त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे.