‘अँटी इन्कम्बन्सी’ तपासून तिकीट कापणार; लोकसभेच्या निकालावरून भाजपने घेतला धडा
By योगेश पांडे | Published: August 13, 2024 02:40 PM2024-08-13T14:40:40+5:302024-08-13T14:41:22+5:30
संघासमोर मांडली स्पष्ट भूमिका
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाला लागलेल्या भाजपकडून महायुतीला काहीही करून सत्तेत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लोकसभेत उमेदवार निवडीत चूक झाल्याचा फटका पक्षाला बसला होता. त्यातून धडा घेत भाजपने विधानसभेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या आमदारांविरोधात जनतेतून ‘अँटी इन्कम्बन्सी’चा सूर असेल त्यांचे तिकीट कापण्यात येणार आहे. या मुद्द्याची चाचपणी करण्याचे पक्षाचे हे धोरण निश्चित मानण्यात येत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोरदेखील हीच भूमिका मांडण्यात आली आहे.
मागील आठवड्यात नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत संघाचे सहसरकार्यवाह अरुण कुमार हेदेखील होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत फडणवीस यांनी लोकसभेतील पराभव व विधानसभेतील नियोजनाबाबत संघधुरिणांना माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत अनेकांविरोधात जनतेत रोष होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून काहीजणांना तिकीट देण्यात आले. त्यांचा पराभव झाला.
उमेदवाराची प्रतिमादेखील महत्त्वाची
निवडणुकीच्या राजकारणात पक्षासोबतच उमेदवाराची प्रतिमादेखील महत्त्वाची असते. कितीही राष्ट्रीय व प्रादेशिक मुद्दे असले तरी स्थानिक मुद्यांमुळे निकाल बदलू शकतो. लोकसभेत हे दिसून आले. बदलत्या राजकारणात उमेदवाराच्या अवतीभोवतीच निवडणूक फिरते, या फडणवीस यांच्या शब्दांतूनच भाजपच्या पुढील दिशेचे संकेत मिळाले. ज्या आमदारांबाबत जनतेत जास्त नाराजीचा सूर असेल त्यांचे तिकीट कापण्यात येण्याचीच दाट शक्यता आहे.