गरिबाची ज्वारी आता श्रीमंतांवर भारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:09 AM2021-02-12T04:09:13+5:302021-02-12T04:09:13+5:30
नागपूर : धावपळीच्या जीवनात हलका आहार म्हणून ज्वारीची भाकर खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्यामुळेच ‘गरिबाचे अन्न’ म्हणून ओळखल्या ...
नागपूर : धावपळीच्या जीवनात हलका आहार म्हणून ज्वारीची भाकर खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्यामुळेच ‘गरिबाचे अन्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीला सध्या सोन्याचे दिवस आले आहेत. शास्त्रीयदृष्ट्याही ज्वारीचे महत्त्व वाढले असून श्रीमंतांचा आहार समजल्या जाणाऱ्या गव्हालाही मागे टाकले आहे. पूर्वी गव्हापेक्षा अर्ध्या किमतीत विकली जाणारी ज्वारी आता दीडपट महाग झाली आहे.
पूर्वी सामान्य शेतकऱ्यांच्या घरात ज्वारी-बाजरीच्या भाकरी थापल्या जायच्या. तेव्हा गहू महाग असल्याने चपात्या खाणे हे संपन्न घराचे लक्षण होते. आहारात ज्वारी गरिबांसाठी व गहू श्रीमंतांसाठी असे वर्गीकरण व्हायचे. पण, काळानुसार लोकांना व्यायाम आणि आरोग्यासाठी वेळ मिळत नसल्याने सहज पचणारे अन्न घेण्याचा सल्ला डॉक्टर व आहारतज्ज्ञांकडून मिळायला लागला. गव्हाच्या तुलनेत ज्वारीचे पदार्थ सहज पचणारे असल्याने आरोग्यही सुदृढ राहायचे. हृदयरोग, मधुमेह आणि स्थूलता टाळण्यासाठी आणि ज्वारीच्या पोषणमूल्यांबाबत जागृती झाल्याने ज्वारीच्या सेवनाचे प्रमाण वाढले. सध्या हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट आदी ठिकाणीही ज्वारीच्या भाकरीला पसंती मिळत आहे. उत्पादन कमी असल्यामुळे गव्हाच्या तुलनेत जास्त किंमत ज्वारीला मिळत आहे. नागपुरात जळगाव येथील दादरी ज्वारीचे भाव ५० रुपये किलो आहेत.
दशकापूर्वी विदर्भात ज्वारीचा पेरा जास्त होता. ज्वारी बाजारात विकण्यासह जनावरांसाठीही खाद्य म्हणून उपयोगात यायचे. परंतु, बदलत्या काळानुसार महाराष्ट्रातील शेती व पिकांची स्थिती बदलली. मुख्यत्वे विदर्भात हळूहळू शेतकऱ्यांनी हंगामीऐवजी नगदी पिकांचे प्रमाण वाढविल्याने साहजिकच ज्वारीचे उत्पादन कमी झाले. त्याची जागा गव्हाने घेतली. ज्वारीची पेरणी झाल्यानंतर जंगली डुक्कर, हरीण, पक्ष्यांच्या सुळसुळाटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय उत्पन्नही इतर पिकांच्या तुलनेत कमी मिळत असून व्यापारी अल्पदरात ज्वारी खरेदी करीत असल्याने शेतकरी ज्वारी पेरण्यासाठी पुढे येत नाहीत.
ज्वारी आरोग्यदायी आहार
सर्वाधिक पोषणमूल्यांमुळे ज्वारीची मागणी वाढली आहे. गव्हात ग्लूटामिनचे प्रमाण जास्त असल्याने पोटाच्या तक्रारी वाढत आहेत. या तुलनेत ज्वारीत प्रथिने, खनिजांचे प्रमाण भरपूर आहे. तसेच तंतूमय पदार्थही जास्त असल्याने पचण्यास हलकी आहे. ज्वारीची भाकरी भाजून खातात. यामुळे तिच्यात गव्हासारखा चिकटपणा नसतो. मधुमेह, स्थूलता, हृदयरोग टाळण्यासाठी ज्वारीचे सेवन गुणकारी ठरते. फायटो केमिकल्समुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. निअॅक्सिनमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. पोटॅशियम, मॅग्नेशियम व मिनरल्समुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात ज्वारीची मदत होते. यामुळे डॉक्टर व आहारतज्ज्ञ ज्वारी खाण्याचा सल्ला देत आहेत.
ज्वारीचे प्रति किलो भाव :
एच-५२२-२४ रु. किलो
गावरानी२८-३० रुपये
दादरी ४८-५२ रुपये