वाघाच्या हाडाचा ताईत वापरणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:08 AM2021-09-11T04:08:48+5:302021-09-11T04:08:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : वाघाच्या हाडापासून तयार केलेला ताईत वापरणाऱ्यासह नखे बाळगणाऱ्यास वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेत अटक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : वाघाच्या हाडापासून तयार केलेला ताईत वापरणाऱ्यासह नखे बाळगणाऱ्यास वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ताईत व नखे जप्त करण्यात आली, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी यांनी दिली.
राजकुमार ब्रिजलाल मरकाम (२९) व कमलसिंग रमेलाल भलावी (४०) दाेघेही रा. सीतापार (गाेंडीटाेला, ता. रामटेक) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात वाघाची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणात सीतापार (गाेंडीटाेला) येथील बाळा वरकडे याला मध्य प्रदेश वन विभागाने अटक केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रातील वन अधिकाऱ्यांचे या गावातील काही नागरिकांवर लक्ष हाेते.
दरम्यान, या गावातील एक व्यक्ती वाघाच्या हाडाचा ताईत वापरत असल्याची, तर दुसऱ्याकडे वाघाची नखे असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी गुरुवारी (दि. ९) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून दाेघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. या पथकाने दाेघांच्याही घरांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे वाघाच्या हाडाचा ताईत व नखे आढळून आली. त्यामुळे दाेघांनाही अटक करून त्यांच्याकडून ताईत व नखे जप्त करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी, देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. परिहार, पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे, क्षेत्र सहाय्यक प्रकाश अंबुडारे यांच्या पथकाने केली.
...
हाडाचे तीन तुकडे
राजकुमार अनेक दिवसांपासून वाघाच्या हाडांचा ताईत वापरत होता. त्याने हा ताईत कंबरेला बांधला हाेता. वन विभागाच्या पथकाने हा ताईत जप्त करून त्याची पाहणी केली. त्यात वाघाच्या हाडांचे तीन तुकडे भरलेले होते. याच पथकाने कमलसिंगच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरी वाघाच्या नखांसह दात आढळून आला. या प्रकरणात आणखी काही आराेपी मिळण्याची शक्यताही सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी यांनी व्यक्त केली.