वाघ देशी अन् नाव विदेशी?
By admin | Published: March 30, 2016 03:07 AM2016-03-30T03:07:27+5:302016-03-30T03:07:27+5:30
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘बिट्टू आणि श्रीनिवास’ या वाघोबांना बड्या अधिकाऱ्यांची दिलेली नामविशेषणे
वाघोबांचे नामकरण ‘खुशामती’साठीच
उमरेड : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘बिट्टू आणि श्रीनिवास’ या वाघोबांना बड्या अधिकाऱ्यांची दिलेली नामविशेषणे केवळ ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या खुशामती करण्यासाठीच असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. ‘लोकमत’ने नामकरणाचे हे प्रकरण उजेडात आणताच आता साहेबांच्या ‘लाडीगोडी’साठीच हे नामकरण करण्यात आल्याचे खुलेआम बोलल्या जात आहे.
साहेब खूश असले की मग आपल्या आवडीनुसार कामे काढणे सोयीचे होते. आपल्यावर एखाद्या कारवाईचे काळे ढग घोंगाऊ लागलेच तर त्यातूनही साहेबांच्या आशीर्वादाने सुटका करून घेता येऊ शकते, हेच यामागील गणित असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते महेश तवले यांनी व्यक्त केले. विशेषत: या डोकेबाज व्यूहरचनेत स्थानिक वन अधिकारी वर्गासह ‘वन्यप्रेमी कम् दलाल’ यांचाही सहभाग असल्याचीही खमंग चर्चा आहे. आपल्याच मनमर्जीने सुरू असलेल्या वनविभागाची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊनदेखील कोणतीही कारवाई न होण्यामागे नामकरणाचे भावनिक नाते जोडले असल्याचीही जोड निसर्गप्रेमी देत आहेत.
ही ‘फेअरी’ कोण?
वाघांना दिलेली वीरप्पन, डेंडू, राष्ट्रपती, माई, गब्बर, माया, कॅटरिना, बाजीराव, श्रीनिवास, बिट्टू, जय, चांदी आदी नावे नागरिकांच्या ओळखीची वा त्यांना समजणाऱ्या नावांपैकी आहेत. तसेच नामकरणानुसार ‘श्रीनिवास आणि बिट्टू’ यांची आई म्हणजे ‘फेअरी’. तर प्रत्यक्षात ही फेअरी दोन अधिकाऱ्यांच्या कोणत्या नात्यातली असाही उलटा सवाल आता विचारला जात आहे. ‘फेअरी’ हे नाव विदेशी असल्याचीही चर्चा जोरावर आहे. फेअरी ही विदेशी बाला असेल तर मग तिचे नाव कुणी दिले. नाव देण्यामागे काय उद्देश. तिचा या अभयारण्याशी काय ‘संबंध’ असाही संतापजनक सवाल निसर्गप्रेमी करीत आहेत. वाघ देशी असले तरी नाव मात्र विदेशी देण्यात आल्याने या ‘इंटरनॅशनल’ नामकरणाला आता कऱ्हांडल्याच्या मातीतूनच विरोध दर्शविला जात आहे.