‘त्या’ वाघाचा मृत्यू इलेक्ट्रिक शाॅकने? वनविभागाकडून तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 05:02 PM2022-03-15T17:02:52+5:302022-03-15T17:10:30+5:30
वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विद्युत करंट लावण्यात आला असावा, असेही बोलले जात आहे. याप्रकरणी सखाेल चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.
उमरेड (नागपूर) : रविवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आलेल्या वाघाचामृत्यू अपघाती नव्हे तर घातपाताने झाल्याची खळबळजनक बाब उजेडात आली आहे. त्यादृष्टीने तपासाची दिशा ठरवून आता वनविभाग शोध घेत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
घटनास्थळी विद्युत तार आढळून आली असून, वनविभागाने विद्युत तार जप्त केल्याची माहिती वनविभागाचे सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांनी दिली. विद्युत तार आढळून आल्याने या ठिकाणी विद्युत करंट लावण्यात आले होते. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांनी हे जाळे पसरविले असावे, असा अंदाजसुद्धा व्यक्त होत आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे शिकाऱ्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.
उमरेड-मकरधोकडा मार्गालगत मारोती करदेवार यांचे शेत आहे. अत्यंत वर्दळीच्या या मार्गालगतच कोळसा खाण तसेच काही अंतरावरच मधुबन काॅन्व्हेंट शाळा आहे. शिवाय घटनास्थळ परिसरात पाणी, झुडपे, गवत आहे. यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असावा, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विद्युत करंट लावण्यात आला असावा, असेही बोलले जात आहे. याप्रकरणी सखाेल चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.
श्वानपथक, ट्रॅप कॅमेरे
अडीच ते तीन वर्षे वय असलेल्या या वाघाच्यामृत्यूप्रकरणी सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांच्याशी चर्चा केली. सोमवारी श्वानपथक आणण्यात आले होते. संपूर्ण परिसर पिंजून काढला. ट्रॅप कॅमेरेसुद्धा लावण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली. मंगळवारपासून परिसरातील शेतकऱ्यांचे, वेकोलि कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविणार असल्याचेही ते म्हणाले.
साेमवारी वाघाचे शवविच्छेदन केल्यानंतर रिजनल फॉरेन्सिक लॅबोरेटरी येथे शवविच्छेदनाचे नमुने पाठविण्यात आलेत. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच प्रकरणास दिशा मिळेल. विद्युत करंट, झुंज की अन्य कारणाने मृत्यू झाला, हे स्पष्ट होईल.
- नरेंद्र चांदेवार, सहायक वनसंरक्षक, (जंकास-२) उमरेड