उमरेड-मकरधोकडा मार्गावर पट्टेदार वाघ मृतावस्थेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 11:17 AM2022-03-14T11:17:23+5:302022-03-14T11:27:53+5:30

वाघाचे डोके चिखलात फसलेल्या अवस्थेत आढळून आले. मृत वाघाची लांबी १२९ सेंमी. तर उंची ९० सेंमी. असून, त्याचे संपूर्ण अवयव शाबूत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

Tiger found dead on Umred-Makardhokada road nagpur | उमरेड-मकरधोकडा मार्गावर पट्टेदार वाघ मृतावस्थेत!

उमरेड-मकरधोकडा मार्गावर पट्टेदार वाघ मृतावस्थेत!

googlenewsNext
ठळक मुद्देशाळेपासून १०० मीटर अंतरावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उमरेड-मकरधोकडा मार्गालगतच्या झुडपात रविवारी (दि.१३) दुपारी ३ वाजताच्या सुमारास वाघ मृतावस्थेत आढळून आला. मृतावस्थेत आढळलेल्या या नर वाघाचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षाचे असून, कोळसा खाणीला खेटून आणि मधुबन कॉन्व्हेंटपासून केवळ १०० मीटर अंतरावर हे घटनास्थळ आहे.

उमरेड-मकरधोकडा या मार्गालगत मारोती कदरेवार यांची शेती आहे. सोबतच याठिकाणी नव्याने ‘ढाबा’ सुरू केला जात आहे. लगतच झुडपांचा परिसर आहे. रविवारी दुपारच्या सुमारास मारोती कदरेवार हे शौचास गेले असता, त्यांना वाघ आढळून आला. वाघोबा दिसताच ते घाबरले. अन्य एका मित्राच्या माध्यमातून वनविभागाला माहिती देण्यात आली.

उत्तर उमरेडचे वनपरिक्षेत्राधिकारी ए. के. मडावी, दक्षिण उमरेडचे वनपरिक्षेत्राधिकारी कोमल गजरे यांनी घटनास्थळ गाठले. याठिकाणी वाघाचे डोके चिखलात फसलेल्या अवस्थेत आढळून आले. मृत वाघाची लांबी १२९ सेंमी. तर उंची ९० सेंमी. असून, त्याचे संपूर्ण अवयव शाबूत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

मृत वाघाच्या शवविच्छेदनासाठी नागपूर बालोद्यान येथे शव रवाना करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. कोळसा खाण परिसरात आतापर्यंत अनेकदा बिबटचे दर्शन झाले आहे. पहिल्यांदाच वाघ या परिसरात आढळून आला. शिवाय केवळ १०० मीटर अंतरावर शाळा आहे. घटनास्थळावरून कोळसा खाणही दिसून येते. अशावेळी वाघ आला कुठून, मृत्यूचे नेमके कारण काय आदी प्रश्न अनुत्तरीत आहेत.

अन् उडाली घाबरगुंडी

नेहमीप्रमाणे मारोती कदरेवार हे आपल्या शेतात दुपारी ३ वाजता पोहोचले. शौचासाठी परिसरातील झुडपात पोहोचताच त्यांना वाघ दिसला. वाघ जिवंत असावा, असे त्यांना प्रथमदर्शनी वाटले. घाबरगुंडी उडाली आणि रस्त्याच्या दिशेने पळत सुटले. लागलीच त्यांनी आपल्या मित्राला ही बाब सांगितली. मित्राने वनविभागाला याबाबतची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी आले. वाघ मृतावस्थेत असल्याचा उलगडा झाला.

Web Title: Tiger found dead on Umred-Makardhokada road nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.