सिल्लारीच्या तलावात सडलेल्या अवस्थेत आढळला वाघ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:57 PM2023-01-13T14:57:32+5:302023-01-13T15:00:02+5:30
मृत्यूचे गूढ कायम
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारीच्या जंगलातील एका तलावात वाघाचे सडलेल्या अवस्थेतील शव गुरुवारी आढळून आले. या वाघाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोधकार्य आरंभले असले तरी, सायंकाळ झाल्याने अंधारामुळे ते शुक्रवारपर्यंत थांबविण्यात आला आहे.
पवनी युनिफाइड बफर रेंजमधील सिल्लारी बिटातील कम्पार्टमेंट क्रमांक २५६ च्या संरक्षित जंगलात असलेल्या कोडू तलावात एका प्राण्याचे शव असल्याची माहिती वन विभागाला गावकऱ्यांकडून कळली. हे घटनास्थळ पूर्व पेंचच्या कंपार्टमेंट क्रमांक ५६८ ला लागून आहे.
ही माहिती मिळाल्यावर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. प्राण्याचे शरीर पूर्णत: सडलेले असल्याने हा प्राणी नेमका कोणता, याचा उलगडा सुरुवातीला झाला नाही. मात्र, हाडांचा आकार आणि शरीररचनेच्या ठेवणीवरून तो वाघ असल्याचे नंतर निदर्शनास आले. वन विभागाचे विशेष पथक या परिसरात शोध घेत असून, पेंचच्या क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली सहायक वन संरक्षक अतुल देवकर आणि वन परिक्षेत्राधिकारी जयेश तायडे यांनी तपास करीत आहेत.
दरम्यान, हा प्राणी वाघ असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले असले तरी स्पष्टता होण्यासाठी, तसेच नर किंवा मादी हे शवविच्छेदनानंतरच कळेल. दरम्यान, अधिक तपासासाठी श्वानपथकाच्या माध्यमातून परिसरात शोध घेण्यात आला. शुक्रवारी पुन्हा हे पथक घटनास्थळाच्या परिसरात तपास करणार आहेत.