तुरीवर सरकारी ‘मर’
By admin | Published: April 25, 2017 01:30 AM2017-04-25T01:30:06+5:302017-04-25T01:30:06+5:30
कळमना बाजारात सोमवारी शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. एकीकडे शासनाने २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद केली आहे.
कळमना बाजारात हजार क्विंटल तूर पडून : हमालही संपावर, शेतकरी दुहेरी संकटात
नागपूर : कळमना बाजारात सोमवारी शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. एकीकडे शासनाने २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तब्बल एक हजार क्विंटल तूर पडून आहे. त्याचवेळी कळमना बाजारातील हमालांनी आपली हमालीची रक्कम वाढवून देण्याच्या मागणीसह संप पुकारला आहे. यामुळे कळमना बाजारात धान्याने भरलेल्या पोत्यांचे ढीग लागले आहेत. यंदा तूरीचे जिल्ह्यात विक्रमी उत्पादन झाले. तूरीच्या पिकावर येणार ‘मर’ हा रोग यंदा आला नसला तरी सरकारी ‘मरा’ने शेतकरी मात्र कोंडीत सापडला आहे. हमालांच्या संपामुळे शेतकऱ्यांना स्वत:च्या मालाची स्वत:च डोहारणी करावी लागली. ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी प्रत्यक्ष कळमना बाजारात या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. कळमना येथील गेट क्र. ८ शेजारी सरकारी तूर खरेदी केंद्र तयार करण्यात आले होते. परंतु खरेदी सुरू झाल्यापासून तर ती बंद होईपर्यंत पोत्याच्या टंचाईमुळे अनेकदा खरेदी बंद करावी लागली. दरम्यान सरकारतर्फे शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते. शेतकरी ते टोकन हातात घेऊन बाजारात चकरा मारीत होते. यातच २२ एप्रिल रोजी सरकारने अचानक तूर खरेदी बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली. यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात आणलेली सुमारे एक हजार क्विंटल तूर तशीच पडून राहिली. शेतकरी त्यांचा हा माल सरकारने खरेदी करावा, अशी मागणी करीत आहे. मात्र त्याचवेळी खरेदी अधिकारी सरकारच्या निर्देशानुसार खरेदी बंद झाली असल्याचे सांगत आहे.
सध्या खुल्या बाजारात तुरीच्या किमती प्रचंड खाली कोसळल्या असून, त्या प्रति क्विंटल ३,८०० ते ४००० रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. त्याचवेळी सरकारकडून शेतकऱ्यांना ५,५०० रुपयांचा भाव मिळत होता. यामुळे जर शेतकरी आपली तूर खुल्या बाजारात विक्री करायला गेला, तर त्याला एका क्विंटलमागे १००० ते १२०० रुपयांचे नुकसान होणार आहे. यामुळेच सर्व शेतकरी कळमना बाजारात ठाण मांडून बसले आहेत.
संपावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक
हमालांच्या संपाविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल सेनाड यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, कळमन्यामधील ठोक बाजारात मागील तीन वर्षांपासून हमालांना एक गाडी भरण्यासाठी प्रति पोते ४ रुपये चढाई आणि गाडी खाली करण्यासाठी प्रति पोते २.५० रुपये उतराई दिल्या जाते. मागील तीन वर्षांपासून यात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत हमाल हमालीची रक्कम दुप्पट करण्याची मागणी करीत आहेत. यावर सोमवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु दुपारपर्यंत या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. बाजार समितीतर्फे जो काही निर्णय घेतला जाईल, त्यात हमालांना योग्य न्याय दिला जाईल, असे त्यांना आश्वासन देण्यात आले आहे.
शिवाय त्यांच्या या संपावर तोडगा काढण्यासाठी उद्या मंगळवारी पुन्हा कळमना येथे मार्केट यार्डमध्ये अडतिया आणि हमाल प्रतिनिधींची सकाळी ११.३० वाजता एक बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव ठप्प
कळमना बाजारातील धान्याचे ठोक व्यवसायी कमलाकर घाटोळे यांच्या मते, सोमवारी हमालांच्या संपामुळे अनेक शेतकरी व खरेदीदारांना स्वत:च पोती उचलावी लागली. एवढेच नव्हे तर त्या मालाची ट्रकमध्ये चढाई आणि उतराईसुद्धा करावी लागली. सावनेर येथील शेतकरी कालीचरण शेंडे म्हणाले, हमालांच्या संपामुळे त्यांच्या मालाचा लिलाव होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना आज बाजारातच मुक्काम ठोकावा लागला.
कळमन्यातील हमाल संपावर
एकिकडे केंद्र सरकारने तुरीची खरेदी बंद केली असताना दुसरीकडे कळमना बाजारातील हमालांनी हमालीची रक्कम दुप्पट करण्याच्या मागणीसह संप पुकारला आहे. याचाही बाजारातील खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव ठप्प झाला आहे. बहुतांश अडतियांच्या दुकानासमोर धान्याच्या पोत्यांचे ढीग लागले आहेत. सोमवारी सकाळी येथील बाजार यार्ड क्र. ६,७,८,९ व १० मध्ये धान्याचे मोठ-मोठे ढीग लागले होते. माहिती सूत्रानुसार कळमना बाजारात एकूण २०६ नोंदणीकृत हमाल आहेत. या व्यतिरिक्त ८०० ते १ हजार हमाल विना नोंदणीने काम करीत आहे. परंतु ते सर्वच संपात सहभागी झाले आहेत. त्यांच्या या संपाने बाजारात विक्रीसाठी आलेल्या तूर डाळ, तांदूळ, गहू, चना व धान या मालाचा लिलाव बंद झाला आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांचा माल बाजारात घेउन येणाऱ्या वाहनांची येथे एकच कोंडी झाली होती. याचा सोमवारी दिवसभर व्यापाऱ्यांसह शेतकरी व अडतियांना त्रास सहन करावा लागला.
एप्रिल महिन्यात १५ दिवस केंद्र बंद
विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनचे ए. आर. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी मागील १९ जानेवारीपासून खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत एकूण २९ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचा माल केंद्राच्या बाहेर पडून आहे, अशा शेतकऱ्यांची यादी तयार केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर तो माल मुख्यालयाकडे पाठविला जाईल. तसेच परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चुकारासुद्धा दिला जाईल. मात्र तूर भरण्यासाठी लागणाऱ्या पोत्याच्या टंचाईमुळे होळीपासूनच या केंद्रावरील खरेदी बंद-सुरू होत असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. यातच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला १५ दिवस केंद्र बंद होते. १९ एप्रिल रोजी नवीन पोते येताच केंद्र सुरू करण्यात आले. यानंतर तीन दिवसात ६ हजार १२५ क्विंटल तुरीची खरेदी झाली.