वाघाने केली वासराची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:58+5:302021-03-25T04:08:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : गेल्या काही दिवसापासून नरखेड तालुक्यात वाघ व बिबट्याने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : गेल्या काही दिवसापासून नरखेड तालुक्यात वाघ व बिबट्याने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत. शेतातील गाेठ्यामधील गुरांवर वाघाने हल्ला चढवीत वासराचा फडशा पाडला. ही घटना उदापूर शिवारात साेमवारी (दि.२२) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामठी येथील शेतकरी वसंत डाखाेडे यांची उदापूर शिवारात शेती असून, ते शेतात राहतात व शेतातच जनावरांचा गाेठा आहे. साेमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास डाखाेडे उठले असता, गाेठ्यात वासरू बांधले हाेते. परंतु पहाटेच्या सुमारास वाघाने हल्ला करून वासरू मृतावस्थेत आढळून आले. याबाबत त्यांनी मंगळवारी वन विभागाला सूचना देऊन एकही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नाही. दरम्यान, बुधवारी (दि.२४) वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वाघाने वासराची शिकार केल्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे २५ हजार रुपयाचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास वन विभागाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.