वाघाने केली पाच गुरांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:08 AM2021-09-13T04:08:27+5:302021-09-13T04:08:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : गेल्या काही दिवसांपासून मालेवाडा, एडसंबा शिवारात वाघाचा मुक्तसंचार आणि दहशत चांगलीच वाढली आहे. गेल्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : गेल्या काही दिवसांपासून मालेवाडा, एडसंबा शिवारात वाघाचा मुक्तसंचार आणि दहशत चांगलीच वाढली आहे. गेल्या पाच दिवसांत वाघाने हल्ला चढवून शेतकऱ्यांच्या पाच गुरांचा फडशा पाडला तर एक गंभीर जखमी आहे. वाघाच्या दहशतीमुळे या भागातील शेतकरी, शेतमजूर व नागरिक चांगलेच भयभीत असून शेतातील कामे करायची कशी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. अशातच पोळ्यांच्या दिवसापासून पट्टेदार वाघाची या परिसरात दहशत पसरली आहे. गेल्या पाच दिवसांत मालेवाडा येथील राजू सूर्यवंशी यांच्या मालकीच्या दोन गाई तर रमेश राऊत, किसन सहारे, अरुण तरारे यांची प्रत्येकी एक गाय अशा पाच गुरांवर वाघाने हल्ला केला. त्यात चार जनावरे ठार तर एक गंभीर जखमी झाले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून वेळीच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतातील पिकांमध्ये मोठ-मोठे खड्डे या वन्यप्राण्यांनी केले असून, पिकांचे प्रचंड नुकसान हाेत आहे. पिकांच्या संरक्षणासाठी रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांना शेतात जागली करावी लागते. मात्र, मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार सुरू असल्यामुळे शेतात जायचे तरी कसे?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वन विभागाने या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.