पेंचमध्ये वाघाची शिकार

By admin | Published: June 28, 2017 02:54 AM2017-06-28T02:54:59+5:302017-06-28T02:54:59+5:30

पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या शिकारीची घटना पुढे आली आहे. यात पेंचमधील तोतलाडोह जलाशयात मासेमारी करणाऱ्यांनीच

Tiger hunting | पेंचमध्ये वाघाची शिकार

पेंचमध्ये वाघाची शिकार

Next

मासेमाऱ्यांचा सहभाग : दोन आरोपींसह वाघनखे व हाडे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या शिकारीची घटना पुढे आली आहे. यात पेंचमधील तोतलाडोह जलाशयात मासेमारी करणाऱ्यांनीच ही शिकार केल्याची धक्कादायक माहिती आहे. याप्रकरणी वन विभागाने दोन आरोपींना अटक करू न त्यांच्याकडून वाघाची दहा नखे, हाडे व अन्य अवयव जप्त केले आहेत.
सोमवारी रात्री वन विभागाच्या पथकाने पेंच शेजारच्या उसरीपार गावातील देवीदास कुमरे व बाबुलाल कुमरे या दोन आरोपींना अटक केली. दरम्यान त्यांच्या घराची झडती घेतली असता, त्यात वाघनखे आणि हाडे मिळाली आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पेंचच्या वन अधिकाऱ्यांना व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील काही गावातील मच्छिमार वाघाच्या शिकारीत सहभागी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सोबतच आरोपी शिकार केलेल्या वाघाची नखे व हाडे विक्री करण्याच्या तयारीत असल्याचीही सूचना मिळाली होती. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी योजना आखली. यानंतर वन अधिकाऱ्यांनी बोगस व्यापारी बनून आरोपींसोबत वाघाच्या हाडांचा दहा हजार रुपयांत व्यवहार केला. त्यानुसार दोन्ही आरोपींनी सोमवारी रात्री खुर्सापार येथून वाघाची हाडे देण्याचे मान्य केले. योजनेनुसार वन अधिकाऱ्यांनी अगोदरच खुर्सापार येथे घेरा टाकला होता. शिवाय आरोपी वाघाच्या हाडांसह तेथे पोहचताच त्यांना अटक करण्यात आली. यानंतर मंगळवारी सकाळी दोन्ही आरोपींना त्यांच्या उसरीपार गावातील घरी नेण्यात आले. तेथे त्यांच्या घराच्या मागील भागात वाघाची हाडे मोठ्या प्रमाणात आढळून आली. तसेच घराची झडती घेतली असता एका डब्यात वाघनखेही भेटली. दरम्यान आरोपीच्या पत्नीने स्वत: डब्यातून वाघनखे काढून दिली. माहिती सूत्रानुसार यात पुन्हा काही आरोपींचा सहभाग असल्याची माहिती आहे. अटकेतील दोन्ही आरोपींना मंगळवारी रामटेक येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करण्यात आले. दरम्यान न्यायालयाने दोन्ही आरोपींची १ जुलैपर्यंत वन कोठडीत रवानगी केली.

किती वाघांची शिकार?
माहिती सूत्रानुसार दोन्ही आरोपी सतत आपले बयान बदलवित आहे. शिवाय त्यांनी एकूण किती वाघांची, कुठे आणि कधी शिकार केली, याविषयी काहीही सांगितले जात नाही. मात्र जप्त करण्यात आलेली नखे आणि हाडांवरू न ते एकापेक्षा अधिक वाघांचे असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या आरोपींनी मागील आॅक्टोबर २०१६ मध्ये सुद्धा वाघाची शिकार केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
वन विभाग हादरला
वन अधिकाऱ्यांनी जप्त केलेली वाघनखे व हाडांवरू न ते अलीकडेच शिकार झालेल्या वाघाची असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नखांच्या आकारावरू न ती वयस्क वाघाची असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हाडे मात्र एकापेक्षा अधिक वाघाची असल्याचे दिसून येत आहे. परंतु त्या अवयवांच्या प्रयोगशाळेतील चाचणी नंतरच एकूण किती वाघांची शिकार झाली, हे स्पष्ट होऊ शकेल. मात्र त्याचवेळी या घटनेने वन विभाग चांगलाच हादरला आहे. मागील काही दिवसांपासून वन विभाग वाघाच्या शिकारी थांबल्याचा दावा करीत होता. परंतु या शिकाऱ्यांनी वन विभागाचा तो दावा फोल ठरविला आहे.

Web Title: Tiger hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.