पेंचमध्ये वाघाची शिकार; ३ संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 09:38 PM2022-11-29T21:38:51+5:302022-11-29T21:39:16+5:30
Nagpur News पेंच टायगर रिझर्व्हमधील नागलवाडी वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना पुढे आली आहे. वनविभागाच्या पथकाने मंगळवारी प्राथमिक चौकशी करून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नागपूर : पेंच टायगर रिझर्व्हमधील नागलवाडी वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना पुढे आली आहे. वनविभागाच्या पथकाने मंगळवारी प्राथमिक चौकशी करून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नागलवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांना सोमवारी सायंकाळी माहिती मिळाली की सुरेवानी क्षेत्रात काही लोकांनी वाघांची शिकार केली आहे. त्यानुसार नागलवाडी रेंजची टीम व स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स (एटीपीएफ)द्वारे सुरेवानीजवळील सिंचन विभागाच्या क्षेत्रात सर्चिंग ऑपरेशन राबविले. दरम्यान, त्यांना वाघाचे शरीर व शरीरातील अन्य भाग सापडले. या घटनेचा प्राथमिक तपास केल्यानंतर सुरेवानी गावातून तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पेंचचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक प्रभुनाथ शुक्ला, एसीएफ किरण पाटील, खापाचे आरएफओ सचिन आठवले, एफडीसीएमचे पी.एस. खंदारे घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून पुरावा गोळा करण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे. मंगळवारी सायंकाळी एनटीसीएच्या निर्देशांनुसार वाघाचे शवविच्छेदन डॉ. सुजित कोलंगट, डॉ. मयूर पावाशे यांनी एनटीएसचे प्रतिनिधी अजिंक्य भटकर, पीसीसीएफचे प्रतिनिधी मंदार पिंगळे, मानद वन्यजीव रक्षक उधमसिंह यादव, डॉ. अमित लोहकरे, डॉ. गौरव बारस्कर, डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. पंकज थोरात व डॉ. हर्षिता राघव यांच्या उपस्थितीत केले.