पेंच बफरजवळ विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू; एका संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 10:58 AM2023-01-12T10:58:15+5:302023-01-12T11:00:32+5:30
शेतापासून जंगलापर्यंत जोडली होती ११ केव्ही लाइन
नागपूर : मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळील रुखड रेंजच्या दरासी बीटमधील बरकमपथ गावातील शेतालगतच्या जंगलात बुधवारी ११ केव्ही लाइनच्या संपर्कात आल्याने ८ वर्षे वयाच्या वाघाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनविभागाने एका संशयिताला अटक केली आहे.
क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नियमित गस्त घालत असताना एका नाल्याजवळील जंगल आणि शेताच्या सीमेवर वाघाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणी केली असता शेतापासून जंगलापर्यंत ११ केव्ही लाइनला जोडलेली केबल टाकण्यात आली होती, अशी माहिती रुखडचे रेंजर डॅनिस उईके यांनी दिली. वाघाचे सर्व अवयव शाबूत होते. पशुवैद्य डॉ. अखिलेश मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रोटोकॉलनुसार वाघाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील आरोपी शोधण्यासाठी दोन किमी परिघातील संपूर्ण परिसर श्वान पथकाच्या मदतीने शोधण्यात आला.
वाघाने यापूर्वी याच परिसरात दोन जणांना ठार केले होते. बुधवारची घटना पेंच-कान्हा व्याघ्र कॉरिडॉरमधील वाघांच्या दृष्टीने गंभीर आहे. या सापळ्यात दुसऱ्याच वाघाचा जीव गेल्याचे दिसत असल्याचे खवासा येथील वन्यजीवप्रेमी ऋतुराज जैस्वाल यांनी सांगितले.