या वाघाला कुणीतरी पकडा हो !
By जितेंद्र ढवळे | Published: April 30, 2024 02:08 PM2024-04-30T14:08:38+5:302024-04-30T14:13:33+5:30
Nagpur : आजवर शंभर जनावरांचा घेतला जीव
नागपूर (पारशिवनी) : पारशिवनी तालुक्यात गत दोन महिन्यांपासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. दोन महिन्यांत जवळपास ४० जनावरांचा वाघाने बळी घेतला. यासोबतच एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत एकूण १०० जनावरे वाघाने मारली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
सोमवारी (दि. २९) पहाटे चिचभुवन येथील विठ्ठल वडस्कर यांच्या शेतातील गोठ्यात असलेल्या जर्सी गाईचा वाघाने फडशा पाडला. तसेच काही दिवसांपूर्वी त्याच्या शेतातील बांधलेली कालवड मारली. यात विठ्ठल वडस्कर यांचे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच सोमवारी भागीमहारी व कान्हादेवी येथील शेतकऱ्यांच्या बकऱ्या वाघाने मारल्या. मार्च व एप्रिल महिन्यात वाघाने वेगवेगळ्या गावात ४० जनावरांचा बळी घेतला आहे. गत महिन्यात चारगाव परिसरात ५ वाघाने हैदोस घातला होता. त्यांनी १० दिवस चारगाव परिसरातच ठिय्या मांडला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अवघड झाले होते. १७ एप्रिल ते आजपर्यंत नयाकुंड, माहुली, पालोरा, मेहंदी, चिचभुवन या परिसरात वाघाने हैदोस घातला आहे.पारशिवनी तालुका हा आदिवासी बहुल, जंगलव्याप्त तालुका आहे. वाघाला बघायचे असल्यास जंगलात जावे लागते. तेही वाघाचे दर्शन होईल हे सांगता येत नाही; परंतु गेल्या दोन महिन्यांत अनेक नागरिकांना शेतात, नदीच्या काठावर, रस्त्यावर, पहाडीला लागून एक नव्हे तर पाच वाघांचे दर्शन होत होते. सध्या नयाकुंड परिसरात एका वाघाने ठिय्या मांडला आहे. तो सभोवतालच्या ५ किमी अंतरावर पाळीव प्राण्यांची शिकार करीत आहे.
वनविभागाच्या प्रयत्नांना अपयश
पारशिवनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी कर्मचाऱ्यांसह वाघाला पकडण्याकरिता शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. पिंजरे देखील लावले. तसेच इंजेक्शनद्वारे वाघाला बेशुद्ध करून पकडण्याकरिता प्रयत्न देखील केले; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. उलट एका घटनेत वाघाने एका वन अधिकाऱ्यावर हल्ला केला तर इतर दोन घटनेत कर्मचाऱ्यांना जीव वाचविण्यासाठी मागे फिरावे लागले.