वाघ, बिबट्यांच्या ट्राॅफींचे हाेणार संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:27+5:302021-07-07T04:11:27+5:30
नागपूर : राज्याच्या वन विभागाने त्यांच्या अधिकारक्षेत्रातील वाघ, चित्ते, जंगली म्हैस, हरीण, सांबर आदींच्या पुरातन ट्राॅफीजच्या संरक्षणाचे काम सुरू ...
नागपूर : राज्याच्या वन विभागाने त्यांच्या अधिकारक्षेत्रातील वाघ, चित्ते, जंगली म्हैस, हरीण, सांबर आदींच्या पुरातन ट्राॅफीजच्या संरक्षणाचे काम सुरू केले आहे. या अनमाेल ठेव्यांच्या संवर्धनाची जबाबदारी हेरिटेज कंझर्वेशन सोसायटीकडे देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दाेन वाघ, दाेन बायसन, बिबट्यांच्या ४ कातडी व इतर प्राण्यांच्या सिंग असलेल्या ट्राॅफीसह २५ माैल्यवान वस्तूंच्या संवर्धनाचे काम केले जाईल.
या कार्यक्रमाअंतर्गत वन मुख्यालय स्तरावर पूर्ण राज्यातील वन कार्यालयात ठेवलेल्या वन्यप्राण्यांच्या ट्राफीजची यादी तयार केली जात आहे. यानंतर या ट्राॅफीजच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू केली जाईल. अनेक वर्षांपूर्वी वन्यप्राण्यांच्या शिकारीमुळे या प्रजाती विलुप्त हाेण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. ज्यामुळे वन्यजीवांच्या शिकारीवर प्रतिबंध लावत त्यांच्या ट्राॅफीज व त्यांच्या अवयवांपासून वस्तू तयार करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले. मात्र जुन्या राजेरजवाड्यांच्या घरी वन्यप्राण्यांच्या ट्राॅफीज ठेवण्याची क्रेझ हाेती. अनेक उद्याेगपतींच्या घरीही या वस्तू दिसून येतात. त्यामुळे अशा ट्राॅफीज ठेवणाऱ्यांना मालकी प्रमाणपत्रही देण्यात आले. मात्र काळानुसार या ट्राॅफीज खराब व्हायला लागल्या आहेत. याशिवाय वन विभागाच्या कार्यालयांमध्येही ३५ ते ४० वर्षे जुनी ट्राॅफीज ठेवलेली हाेती. त्यांचे संवर्धन केले नाही, तर त्या खराब हाेऊन नष्ट करण्याची पाळी येईल. अशाने या माैल्यवान वस्तू नवीन पिढीला पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी हेरिटेज कंझर्वेशन सोसायटीला सेमिनरी हिल्स परिसरात एका लॅबसाठी जागा दिली गेली आहे.
गोरेवाडामध्ये संग्रहालय बनविण्याचा हाेता मानस
माजी वनमंत्री संजय राठाेड यांनी संपूर्ण राज्यातील वन्यजीव ट्राॅफीजचे संवर्धन करून गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात पर्यटकांसाठी संग्रहालय बनविण्याचा मानस व्यक्त केला हाेता. अशा वस्तू ज्यांच्याकडे आहेत त्यांनाही त्या संग्रहालयात दान करण्याचे आवाहन करण्यात येणार हाेते.
वारशांचे संवर्धन आवश्यक
हेरिटेज कंझर्वेशन सोसायटीच्या लीना हाते यांच्या मते संस्कृतीशी संबंधित कलाकृती, पांडुलिपी, दस्तावेज आणि ट्रॉफीज आदी वस्तू आपला वारसा आहेत. पुढच्या पिढीसाठी त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. वन विभागाच्या या पुढाकाराने अशा माैल्यवान वस्तूंच्या संवर्धनाचे काम हाेणार याचा आनंद असल्याचे त्या म्हणाल्या.
मध्य भारतात पहिल्यांदा ही सुरुवात
राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण अनुसंधान शाळा (लखनऊ)चे माजी महासंचालक व हेरिटेज कंझर्वेशनचे मार्गदर्शक डॉ. व्ही. व्ही. खरवडे यांनी राज्याच्या वन विभागाद्वारे ट्रॉफीज संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले आहे. अशा सर्व प्रकारच्या वारशांच्या संवर्धनासाठी साेसायटी तत्पर असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.