वनविभागाचा वाघ अन् महामंडळाचा साग!
By जितेंद्र ढवळे | Published: February 17, 2024 07:18 PM2024-02-17T19:18:19+5:302024-02-17T19:18:37+5:30
- वनमंत्री मुनगंटीवार : वनविकास महामंडळाचा सुवर्णमहोत्सव.
नागपूर : वनविभागाचा वाघ आणि महामंडळाचा साग अशी एक वेगळी ओळख आता निर्माण होत आहे. वन उत्पादनांच्या निर्मितीचा पाच दशकाहून अधिकचा अनुभव असणाऱ्या महाराष्ट्र वनविकास महामंडळाने आता रोजगारनिर्मितीला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र वनविकास महामंडळाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वसंतराव देशपांडे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेंद्र टेंभुर्णीकर, पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता यांच्यासह वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनमंत्री म्हणाले, राज्याच्याच नव्हे तर देशाच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प व वास्तूनिर्मितीमध्ये महाराष्ट्र वनविकास महामंडळाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशवासीयांच्या श्रद्धेचे आदर्श असलेल्या राम मंदिराचे प्रवेशद्वार असो किंवा संसद भवनाची द्वार निर्मिती आपल्या महाराष्ट्राच्या वनविकास महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण सागवान लाकडापासून झाली आहे. गत ५० वर्षांचे सिंहावलोकन केले असता महामंडळाची आतापर्यंतची वाटचाल देदीप्यमान ठरली आहे. यंदा महामंडळाने सर्वाधिक नफा प्राप्त केला आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वनविकास महामंडळाच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या माजी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वनमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. संचालन वृषाली देशपांडे आणि आसावरी देशपांडे यांनी केले.