वाघ शिकारीतील आराेपीचा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला; वन काेठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:02 PM2023-01-17T12:02:04+5:302023-01-17T12:02:31+5:30
१५ दिवसांची न्यायालयीन काेठडी
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर क्षेत्रात नुकत्याच झालेल्या वाघाच्या शिकार प्रकरणातील आराेपीने वन काेठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्याने हल्ला केला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वन क्षेत्रात वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण समाेर आले. या प्रकरणात वनविभागाने चार आराेपींना अटक केली हाेती. या गुन्हेगारांना जेएमएफसी रामटेक न्यायालयाने १७ जानेवारीपर्यंत वन काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोठडीदरम्यान यातील एक आरोपी विनोद चोखंद्रे याने वन कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला हाताळणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला. याप्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी देवलापार पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, रामटेक यांचेसमोर हजर केले. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
तसेच एका आरोपीकडून मृत वाघाच्या शरीराचे आणखी काही काढलेले अवयव जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. फरार गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. विद्युत तारांच्या अवैध वापरातून झालेल्या शिकारप्रकरणी आवश्यक माहिती आणि मदतीसाठी महावितरण विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. दरम्यान आज वन कोठडी संपत असल्याने अटक केलेल्या गुन्हेगारांना पुढील कार्यवाहीसाठी रामटेक न्यायालयासमाेर हजर करण्यात येणार आहे.
पुढील तपास क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक अतुल देवकर आणि पवनी वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे करीत आहेत.