नागपुरातील हुडकेश्वरमध्ये वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 08:56 PM2020-07-21T20:56:49+5:302020-07-21T20:58:05+5:30
शहरालगतच असलेल्या हुडकेश्वर गावाच्या परिसरात वाघ फिरत असल्याच्या चर्चेने सध्या गावकरी धास्तावले आहेत. एका मृत झालेल्या जंगली रानडुकराजवळ वन्यप्राण्यांचे पगमार्क आढळल्याने या चर्चेला पेव फुटले आहे. परिसरात वाघ फिरत असल्याचीही जोरदार चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरालगतच असलेल्या हुडकेश्वर गावाच्या परिसरात वाघ फिरत असल्याच्या चर्चेने सध्या गावकरी धास्तावले आहेत. एका मृत झालेल्या जंगली रानडुकराजवळ वन्यप्राण्यांचे पगमार्क आढळल्याने या चर्चेला पेव फुटले आहे. परिसरात वाघ फिरत असल्याचीही जोरदार चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.
प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी अज्ञात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या एका जंगली रानडुकराजवळ वन्यप्राण्यांचे पगमार्क आढळून आले. या घटनेनंतर हुडकेश्वर गावाच्या परिसरात रात्री वाघ फिरत असल्याची चर्चा पसरली. यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच धास्तावले असून सायंकाळनंतर घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. वनविभागाच्या सेमिनरी हिल्सच्या चमूला या संदर्भात माहिती प्राप्त होताच या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र पगमार्क कोणत्या प्राण्याचे आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही. हे पगमार्क वाघाचे की बिबट्याचे यावर एकमत नाही. अशातच हुडकेश्वर, पिपळा आणि बहादुरा आदी गावांच्या परिसरात वाघ फिरत असल्याचे पाहिल्याची गावकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा पसरली आहे. वनविभागाच्या पथकाने या परिसरात गस्त केली. परिसरात पाच कॅमेरा ट्रॅपही लावले. अद्याप कोणताही प्राणी आढळला नाही.
कॅमेरा ट्रॅपमध्ये प्राणी नाही
आरएफओ विजय गंगावने यांनी दिलेल्या महितीनुसार, गावकऱ्यांकडून माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळाची पहाणी केली. मात्र तिथे पगमार्क आढळले नाहीत. या नंतर दोन दिवसांपासून परिसरात पाच कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. अपेक्षित प्राणी न दिसल्यास हे कॅमेरे हटविले जातील.