काेदेगाव शिवारात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:30+5:302020-12-23T04:07:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : गेल्या महिनाभरापासून काेदेगाव, खेडी, आजनी, शिर्डी, गडेगाव शिवारात वाघाने दहशत निर्माण केली आहे. वाघाच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : गेल्या महिनाभरापासून काेदेगाव, खेडी, आजनी, शिर्डी, गडेगाव शिवारात वाघाने दहशत निर्माण केली आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतमजूर शिवारात जाण्यास नकार देतात. त्यामुळे शेतीची कामे खाेळंबली जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या आठवड्यात आजनी शिवारात या पट्टेदार वाघाने बस्तान मांडून एका म्हशीची शिकार केली हाेती. त्याठिकाणी वन विभागाने कॅमेरे लावले असता, त्या कॅमेऱ्यात वाघ दिसून आला. दरम्यान, साेवमारी (दि.२१) काेदेगाव शिवारात वाघाने पुन्हा दर्शन दिल्याने दाेन शेतमजूर महिला बेशुद्ध पडल्या. परिसरातील गावात वाघाची भीती निर्माण झाली असून, वन विभागाने या वाघाचा तातडीने बंदाेबस्त करावा तसेच मृत गुरांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
आजनी व काेदेगाव शिवारात वाघाचा वावर असून वन विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस नजर ठेवून आहेत. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाताना समूहाने जावे, एकमेकांना आवाज द्यावा, हातात काठी ठेवावी, काही दिवस शेतात जनावरे बांधू नये तसेच वाघ दिसताच वन विभागाला सूचना द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांनी केले आहे.