वाघाचे रखवालदार उपाशी !
By admin | Published: May 16, 2016 03:16 AM2016-05-16T03:16:47+5:302016-05-16T03:18:02+5:30
पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (एसटीपीएफ) जवान रात्रंदिवस वाघाच्या संरक्षणात जंगलात पहारा देत आहेत्.
पेंच व्याघ्र प्रकल्प : ‘एसटीपीएफ’ चे पगार थांबले
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (एसटीपीएफ) जवान रात्रंदिवस वाघाच्या संरक्षणात जंगलात पहारा देत आहेत्. मात्र या जवानांना मागील तीन महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व जवानांना जंगलात २४ तास तैनात करण्यात आले आहे. असे असताना वन विभागाने त्यांच्या भोजनाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च्या भोजनाची स्वत:च व्यवस्था करावी लागते. मात्र तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने पोट कसे भरावे,अशा चिंतेत सापडले आहे. शिवाय उपाशीपोटी ही फौज वाघाची सुरक्षा कशी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
शिकाऱ्यांपासून वाघांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) च्या पुढाकारातून वन विभागाने मागील चार वर्षांपूर्वी नागपूरसह संपूर्ण राज्यात या एनटीपीएफ जवानांची विशेष भरती केली आहे. त्यानुसार सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण ७६ एसटीपीएफ जवान तैनात आहेत. त्यामध्ये ५४ तरुण आणि २२ तरुणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या जवानांचे पगार वेळेवर न होणे, ही नेहमीच समस्या बनली आहे. मागील वर्षी सुद्धा या जवानांच्या पगाराची अशीच समस्या निर्माण झाली होती. वनविभाग वेळोवेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (एनटीसीए) बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आले आहे. या सर्व जवानांचे तीन महिन्यांपासून पगार थांबल्याने त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. या एसटीपीएफ फौजेतील बहुतांश तरुण गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासोबतच वन विभागाने या सर्व जवानांच्या प्रवास भत्त्याचे बिले मागील चार वर्षांपासून रोखून ठेवले असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय दुसरीकडे वन विभागातील इतर वनरक्षकांचे मात्र दोन महिन्यापूर्वीच प्रवासभत्ता बिले मिळाली आहे. तसेच ताडोबा येथील एसटीपीएफ जवानांना सुद्धा प्रवासभत्ता बिले देण्यात आली असल्याची माहिती आहे. असे असताना आमच्यावरच अन्याय का, असा पेंचमधील सर्व जवानांनी प्रश्न उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)