वाघाचे रखवालदार वेतनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: June 20, 2017 02:08 AM2017-06-20T02:08:28+5:302017-06-20T02:08:28+5:30
रात्रंदिवस जंगलात वाघाची सुरक्षा करणाऱ्या वन विभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
एसीटीपीएफचे पगार अडले : उपाशीपोटी कशी करणार सुरक्षा ?
जीवन रामावत । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रंदिवस जंगलात वाघाची सुरक्षा करणाऱ्या वन विभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, टिपेश्वर, मानसिंगदेव व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात तैनात असलेल्या शेकडो जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शिकाऱ्यांपासून वाघांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) च्या पुढाकारातून नागपूरसह संपूर्ण राज्यात या दलाची (एनटीसीए) विशेष भरती करण्यात आली आहे. यात नागपूर वन विभागात सुमारे १०५ जवानांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे, या दलात तरुणांसह अनेक तरुणींचाही समावेश आहे. ही सर्व फौज रात्रंदिवस रानावनात आपले कर्तव्य बजावत आहे, असे असताना जंगलात त्यांच्यासाठी सोई-सुविधांचा नेहमीच अभाव राहिला आहे. परंतु तरी या जवानांनी त्याविषयी कधीही ओरड न करता, वाघाच्या सुरक्षेला प्राथमिकता दिली आहे. त्यांची ही कर्तव्यदक्षता आणि जंगलातील नियमित गस्तीमुळे विदर्भातील वाघ सुरक्षित झाला आहे. शिवाय त्यामुळेच मागील काही वर्षांत विदर्भाच्या जंगलातील वाघांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचवेळी या जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार थांबल्याने त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश तरुण गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे अनेकजण प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम गावातील वृद्घ आई-वडिलांना पाठवित असतात. तर काहीजणांना मुलाबाळांच्या शिक्षणासह कुटूंबाचे पालनपोषण करावे लागते. यापैकी एका जवानाच्या मते, मागील तीन महिन्यांपासून उसनवारी करून खर्च भागविला जात आहे. त्यामुळे अगोदरच डोक्यावर कर्ज झाल्याने आता कुणासमोर हात पसरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पगारासंबंधी पेंच कार्यालयात चौकशी केली असता, पुन्हा दिवाळीपर्यंत पगार होणार नसल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत आम्ही जगावे कसे असा प्रश्न यावेळी त्याने उपस्थित केला. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने या सर्व जवानांना पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, मानसिंगदेव, टिपेश्वर व उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात तैनात केले आहे. शिवाय वन विभागाने या सर्व जवानांची जंगलात भोजनाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च आपल्या भोजनाची व्यवस्था करावी लागते. परंतु आता त्यांच्या हाती पगारच मिळत नसल्याने पोट कसे भरावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. शिवाय हा जवान उपाशीपोटी वाघाची सुरक्षा कशी करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिकारी म्हणतात, पाठपुरावा सुरू
‘‘एसटीपीएफ जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले आहेत, हे खरे आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातर्फे त्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. या जवानांच्या पगारासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष निधी दिला जातो. परंतु मागील काही महिन्यांपासून तो निधी मिळण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे या जवानांचे पगार होऊ शकले नाही. परंतु त्यासाठी वरिष्ठ कार्यालयासह मंत्रालयाशी सतत संपर्क साधला जात आहे. मंत्रालयाकडून निधी उपलब्ध होताच पगार दिले जाईल. ’’
-माणिकराव कातकडे
सहायक वनसंरक्षक, एसटीपीएफ