मिहान परिसरात पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:31 AM2019-11-30T00:31:16+5:302019-11-30T00:32:42+5:30
मिहान परिसरातच वाघाने आपला मुक्काम ठोकला आहे. वन विभागाने शुक्रवारी कॅमेरा ट्रॅपची तपासणी केली असता वाघ इन्फोसिस कंपनीच्या मागील भागातील नाल्याजवळ फिरताना आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान परिसरातच वाघाने आपला मुक्काम ठोकला आहे. वन विभागाने शुक्रवारी कॅमेरा ट्रॅपची तपासणी केली असता वाघ इन्फोसिस कंपनीच्या मागील भागातील नाल्याजवळ फिरताना आढळला. त्यापूर्वी बुधवारी २८ नोव्हेंबरला रात्री इन्फोसिस कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाघ दिसला होता.
मिहानच्या इन्फोसिस कंपनीच्या मागे १६ नोव्हेंबरला एका कर्मचाऱ्याला वाघ दिसला होता. त्याच परिसरात पुन्हा गुरुवारी वाघ परत आल्याचा पुरावा मिळाला आहे. याची सूचना मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिहानच्या इन्फोसिस कंपनीत जाऊन तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी मिहान प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह इन्फोसिस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यासोबतच इन्फोसिस कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या परिसरातील झुडप, गवत कापण्याची सूचना दिली. इन्फोसिस कंपनीच्या सुरक्षा भिंतीसह परिसरातील प्रत्येक जागी वाघाच्या पायांचे ठसे दिसले. या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वन विभागाचे उप वनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी वाघावर २४ तास नजर ठेवण्याच्या सूचना पथकाला दिल्या आहेत. हा वाघ वन विभागाच्या हिंगणा रेंजमधून आल्याची माहिती आहे. हा वाघ आधीच बराच प्रवास करून या परिसरात आलेला आहे. शेतशिवारात वावरतांना हा वाघ मनुष्यांना टाळत असल्याची शक्यता मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी व्यक्त केली. वनविभागाची टीम सक्रियपणे या वाघाचा शोध घेत असून कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. याबाबत संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून विभागातर्फे सतत नजर ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातही वाघाची दहशत
मिहान परिसरासह या भागातील गावांमध्येही मागील १०-१२ दिवसांपासून वाघाची दहशत पसरली आहे. शुक्रवारी वडगाव (गुर्जर) शिवारात सरपंच अक्षय सुभाष लोडे यांच्या शेतावर वाघ आढळला. जवळच्या नाल्यावर पाणी पिण्यासाठी वाघ तेथे आला असावा अशी माहिती राऊंड ऑफिसर एस.डी.त्रिपाठी यांनी दिली. गुरुवारी सोंडापार नाल्याशेजारी श्रावण गंधारे व भैया बावणकर यांच्या शेताजवळ दुपारी १.३० वाजता सुनील आष्टनकर आणि पन्ना झाडे यांना पट्टेदार वाघ दृष्टीस पडला. २६ नोव्हेंबरला पहाटे वृंदावन सिटी जवळील सोंडापार शिवारातील अरुण आष्टनकर यांच्या शेतातील गोऱ्ह्याची वाघाने शिकार केल्याची वनविभाने पुष्टी केली आहे. वनविभागाच्या बुटीबोरीचे आरएफओ एल.व्ही.ठोकळ ,वनरक्षक अंकुश नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली चमूने शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. यावेळी दवंडी देऊन ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सोंडापार ,खडका,सुकळी ,पट्यादेव, दातपाडी, कोतेवाडा ,फायर एकर , वृंदावन सिटी,मिहान,तेल्हारा,सुमठाना,वडगाव, दाताळा ,सालईदाभा, पोही , वटेघाट आदी क्षेत्रात भ्रमण करणारे वाघ शेवटी कोठून आले असावे, तसेच त्यांची संख्या नेमकी किती असावी हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान या संपूर्ण परिसरात वाघाचे भ्रमण व त्यामुळे निर्माण झालेली दहशत यामुळे वनविभागाची टीम सक्रिय झाली आहे.