नागपूर परिसरात वाघ आणि बिबट्याची अद्याप धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 11:46 AM2019-12-02T11:46:39+5:302019-12-02T11:48:06+5:30
मिहान परिसरातील वाघ आणि अंबाझरी जैवविविधता पार्कमधील बिबट्या हे दोघेही सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. या दोघांच्याही शोधासाठी वन विभागाची पथके फिरत असली तरी ते दोघेही दडले कुठे, याचा पत्ता अद्यापही लागलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान परिसरातील वाघ आणि अंबाझरी जैवविविधता पार्कमधील बिबट्या हे दोघेही सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. या दोघांच्याही शोधासाठी वन विभागाची पथके फिरत असली तरी ते दोघेही दडले कुठे, याचा पत्ता अद्यापही लागलेला नाही.
अंबाझरी जैवविविधता उद्यानातील पाणवठ्याजवळ कक्ष क्रमांक ७९७ मध्ये २८ नोव्हेंबरच्या सकाळी बिबट्याचे पगमार्क आढळले होते. तेव्हापासून त्याचा शोध सुरू आहे. वन्यजीव अभ्यासकांकडून तपासणी केली असता हे पगमार्क बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्कमध्ये दररोज नागरिक आणि वन्यजीवप्रेमी सकाळी फिरायला येतात. बिबट्यापासून धोका होऊ नये म्हणून व त्याच्या शोधकार्यात अडथळे येऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी हे पार्क १ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. या तीन दिवसातही तपास न लागल्याने हे पार्क पुन्हा ७ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
शुक्रवारपासून या जैवविविधता पार्कमध्ये ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. मात्र त्यातही बिबट्या आलेला नाही. या पार्कचा आणि लागूनच असलेल्या अंबाझरी जंगलाचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे बिबट्या या परिसरात असल्याचे गृहित धरले जात आहे. हे लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी हे पार्क पुढील सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाघाचाही तपास सुरूच
मिहान परिसरातील वाघाचा तपासही मागील दोन दिवसापासून रेंगाळला आहे. लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये २९ तारखेला तो दिसला होता. त्यानंतर पुन्हा तो दिसला नसल्याने वनविभागाचे पथकही हतबल झाले आहे. त्याच्या निगराणीसाठी पथक तैनात आहे. पशुवैद्यकीय पथकालाही परिसराची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र त्याचा शोध लागत नसल्याने तो संरक्षित जंगलाकडे गेला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.