वाघ नागझिरात घटले, ताडोबात वाढले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 04:54 AM2020-08-02T04:54:41+5:302020-08-02T04:55:12+5:30
एफडीसीएमच्या नियोजनात निसर्गवन तुटले : सुरक्षित आश्रयस्थानांचा विचार नाही
गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : निसर्गवन, जैवविविधता आणि पाणी हे जंगलाचे वैभव असते. त्याशिवाय प्राणी स्थिरावत नाही. नैसर्गिक अन्नसाखळी मजबूत होत नाही. वाघांसारख्या प्राण्यांसाठी बांबूवन आणि गवताळ प्रदेशाचीही गरज असते. मात्र, अलिकडे वन विकास महामंडळाकडून (एफडीसीम) जंगलात सागांचे एकसुरी रोपण होत असल्याने वाघ टिकत नाहीत. असा अनुभव नागझिरा आणि ताडोबाच्या जंगलाच्या तुलनात्मक अभ्यासातून पुढे आला आहे.
सुमारे ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८० च्या सुमारास नागझिराच्या जंगलात ६ ते ८ वाघ होते. एवढेच वाघ ताडोबाच्याही जंगलात होते. मात्र, या काळामध्ये ताडोबातील वाघ वाढून आता १०० वर पोहोचले, परंतु नागझिरामध्ये असलेल्या वाघांची संख्या ६ ते १० च्या वर गेलेली नाही.
ताडोबाचे जंगल वाघांसाठी नेहमीच आदर्श राहिले आहे. गवताळ प्रदेश, बांबू, निसर्गवन हे वातावरण तिथे पोषक आहे.
प्रत्यक्षात ताडोबाचे क्षेत्रफळ फारच कमी म्हणजे ११६ चौरस किलेमीटर आहे. यानुसार येथे १२ ते १८ वाघ सामावण्याची क्षमता असली तरी अंधारी प्रकल्पामुळे ती वाढली. यासोबतच अनेक बफर या वनाशी जोडले गेले. त्यामुळे वाघांचा सुरक्षित अधिवास वाढला.
नागझिरा हा इंद्रावती-कान्हाचा दुवा
नवेगाव, नागझिराचे जंगल हे इंद्रावती आणि कान्हा या वनक्षेत्राला जोडणारे महत्त्वाचे कॉरिडोर आहे. हा वाघांचा भ्रमणमार्ग असला तरी वाघ मात्र येथे स्थिरावत नाही. अलिकडे वाढलेल्या वाघांच्या अपघाती मृत्यूच्या घटनाही गंभीर बाब ठरत आहे. नागझिरालगत असणाऱ्या चहुबाजूंच्या शेतींचे रक्षण करण्यासाठी विजेचे सापळे मोठ्या प्रमाणावर लावले जात असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. हा देखील महत्त्वाचा धोका मानला जात असल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगतात.