राज्यातले वनक्षेत्र अन वाघही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:20 PM2019-05-30T12:20:33+5:302019-05-30T12:20:57+5:30
यंदा २५० च्या वर वाघांची संख्या पोहोचली आहे. हे मोठे वाघ असून ज्यांची मोजणी होत नाही, असे लहान वाघही १०२ वर पोहोचले आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात वनांचे क्षेत्र वाढत असल्यामुळे वाघ वाढले असून यंदा २५० च्या वर वाघांची संख्या पोहोचली आहे. हे मोठे वाघ असून ज्यांची मोजणी होत नाही, असे लहान वाघही १०२ वर पोहोचले आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
वन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कार्यक्रमांसदर्भात बुधवारी वनामती येथे नागपूर विभाग आणि अमरावती विभागाचा आढावा त्यांनी घेतला. या आढावा बैठकीनंतर पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आ. अनिल सोले होते. सुधीर मुनगंटीवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, वनांचे क्षेत्र वाढत असल्यामुळे वाघांची संख्याही वाढत आहे. राज्यात वाघांची संख्या वाढली असून पुढील पाच वर्षे वाघांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची माहितीही त्यांनी दिली.
दारूबंदी उठवण्यावरून काँग्रेसला चिमटा
महाराष्ट्रात चंद्रपूर येथून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी अलीकडेच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले ‘काँग्रेसचे सदस्य होताना मी दारू पिणार नाही, असे लिहून द्यावे लागते. पावती बुकात तशी नोंदही आहे. त्यानंतर सदस्य झाल्याचे पावती बुक मिळते. काँग्रेस आता सदस्य होण्याचे ते पावती बुक फेकणार आहे का, असा सवाल करीत चिमटा काढला.